आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा:अजिंठ्याच्या गल्लीतून जाताना ब्रिटनच्या प्रिन्स फिलिपनी स्वीकारले होते स्वागत

अजिंठा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 फेब्रुवारी 1959 रोजी प्रिन्स फिलिप यांनी अजिंठा लेणीला भेट देऊन इतिहास जाणून घेतला. - Divya Marathi
2 फेब्रुवारी 1959 रोजी प्रिन्स फिलिप यांनी अजिंठा लेणीला भेट देऊन इतिहास जाणून घेतला.
  • जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा कलाविष्कार पाहून महाराणी एलिझाबेथ द्वितीयचे पती झाले थक्क

ब्रिटनचे प्रिन्स फिलिप यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. भारतातील ऐतिहासिक स्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. तीन वेळा राणी एलिझाबेथ यांच्यासोबत तर एक वेळेस स्वतंत्रपणे ते भारतात आले. १९५९ मध्ये ते प्रथमच भारतात आले होते तेव्हा अजिंठा गावाला भेट देत येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहून येथील कलाविष्काराचे भरभरून कौतुक केले व इतिहास जाणून घेतला होता. त्यांच्या या भेटीबद्दल अनेक रोचक बाबी इतिहास संशोधक विजय पगारे यांनी सांगितल्या. प्रिन्स फिलिप २ फेब्रुवारी १९५९ रोजी अजिंठा लेणी पाहण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी अजिंठा गावाला आता असलेला बायपास महामार्ग नव्हता. लेण्यांना जाण्यासाठी गावातूनच एकमेव मार्ग जात होता. इंग्लंडचे राजे अजिंठ्याला येणार म्हणून एक दिवस आगोदरपासूनच अजिंठ्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.

प्रिन्स फिलिप हे सकाळी १० वाजेच्या सुमारास अजिंठा गावात आले असता खुल्या गाडीतून त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. पोलिसांनी प्रत्यक्ष स्वागतास मनाई केल्याने गावातील काही तत्कालीन नागरिकांनी त्यांच्या खुल्या गाडीच्या दिशेने सोबत आणलेले हार भिरकावले. तत्कालीन अधिकाऱ्यांकडून अजिंठा गावचा संक्षिप्त इतिहास जाणून घेतला व येथील नागरिकांनी त्यांच्या केलेल्या विशेष भारतीय शैलीच्या स्वागताचे कौतुक केले होते, अशी माहिती स्थानिक इतिहास संशोधक विजय पगारे यांनी “दैनिक दिव्य मराठी’शी बोलताना दिली. त्यांच्याकडे प्रिन्स फिलिप यांच्या अजिंठा दौऱ्याचे छायाचित्र व व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. या नंतर त्यांनी अजिंठा लेणी येथे भेट देऊन जगातील अद्भुत कलाविष्कार अनुभवला.

जामा मशिदीतील स्थापत्य शैलीचे केले कौतुक
अजिंठ्यातील जामा मशिदीला भेट दिली व स्थापत्य शैलीचे कौतुक केले होते. तत्पूर्वी गांधी चौकात काशीनाथ साठे, अहमद बिन ईसा, अब्दुरब चाऊस, शासकीय प्रतिनिधी बाबूराव देशमुख व वनपरिक्षेत्र अधिकारी गोरे यांनी प्रिन्सचे स्वागत केले होते, असे विजय पगारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...