आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकाही शेतकऱ्याला एक हजार रुपयांपेक्षा कमी विमा देऊ नका, असे आदेश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादच्या बैठकीत विमा कंपन्यांना दिले होते. पण या कंपन्यांनी सत्तारांचा आदेश पायदळी तुडवला आहे. मराठवाड्यातील सात लाख शेतकऱ्यांचे दावे फेटाळल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. त्यानंतर सत्तार यांनी विमा कंपन्यांना धारेवर धरले होते तरीही शेतकऱ्यांची धूळधाण करणे सुरूच आहे. राज्यात १७९१० शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी मदत मिळाली असून हा आकडा वाढू शकतो.
परभणी जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने ३०६४ शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी रक्कम दिली. एकूण भरपाईचा आकडा १८ लाख ५३ हजार रुपये आहे. बजाज अलायंझने बीड जिल्ह्यात १०,८७० शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम दिली. हा आकडा ६७ लाख ७७ हजार आहे. कृषी सहसंचालक दिनकर जाधव म्हणाले की, कृषिमंत्र्यांच्या आदेशाचे पालन झाले नसल्याचे दिसते. परभणी जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कोंडिराम घाडगे यांनीही एक हजारापेक्षा कमी मदत मिळाल्याचे सांगितले.
सोयाबीन विमा १०९ रुपये मी सोयाबीनचा ४४० रुपयांचा विमा काढला होता. आणि फक्त १०९ रुपये विमा मिळाला. विष्णू काळे, पाथरगव्हाण, परभणी
कंपन्यांवर गुन्हे दाखल व्हावेत शेतकरी कंपन्या पैसे कमावण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कठोर उपाययोजना हाच एकमेव मार्ग आहे. राजन क्षीरसागर, पीक विमा अभ्यासक
फक्त २४६ रुपये मिळाले अर्धा एकरचा विमा काढल्यानंतर २४६ रुपये मिळाले आहेत. सरकार मदत देत आहे की काय करतेय हा प्रश्न पडला आहे. किशन घाडगे, परभणी
मूग गेला, ७३ रुपये मिळाले अर्धा एकर मूग वाया गेला. अर्धा एकरसाठी मी ८८ रुपये भरले होते. त्या मोबदल्यात ७३ रुपये विमा मिळाला. भरत तुरे, पाथरगव्हाण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.