आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्या महाराष्ट्राने देशाला मनरेगा दिली त्याच महाराष्ट्र मनरेगाचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने करत आहेत. बुधवारी मनरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्यात ३६०० कंत्राटी कर्मचारी आणि २९ हजार रोजगारसेवक आहेत. मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा व त्यांचा आकृतिबंध तयार करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. या बेमुदत आंदोलनामुळे रोहयोच्या कामांना मोठा फटका बसत आहे.
रोहयोचे कंत्राटी कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने आंदोलन करत आहेत. गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले होते, मात्र त्यावर कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे राज्यातल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी यात केल्याची माहिती संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुनील खंदारे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. संघटनेच्या वतीने याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव तसेच मनरेगाचे आयुक्त यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.
चार वर्षांपासून मानधनात कुठलीही वाढ नाही जिल्हाध्यक्ष सुनील खंदारे यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून आम्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांची कोणतीही मानधनवाढ झालेली नाही. पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रम अधिकाऱ्याला साठ हजार रुपये इतके वेतन दिले जाते, तर महाराष्ट्रामध्ये केवळ १६ हजार रुपये इतके मानधन दिले जाते. त्याप्रमाणे येथेही मानधन देण्यात यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.
आकृतिबंध वेगळा करा, कोरोनाकाळातही बजावली कामगिरी या योजनेअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कर्मचारी कामे करीत आहेत. वरिष्ठांनी दिलेली कामे व जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडत असून कोरोनाकाळातही नियमित कामे केली असल्याचे खंदारे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांनाही समृद्ध करावे मनरेगाच्या योजना राबवणारे कर्मचारीच अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे आम्हालाही समृद्ध करण्यात यावे अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनरेगातील हे कंत्राटी कर्मचारी २५ ते ४० या वयोगटातील आहेत. त्यामुळे या युवकांनाच अत्यल्प मानधनावर नोकरी करण्याची वेळ आल्यामुळे आर्थिक अडचणीचा फटका बसत आहे.
मनरेगाच्या कामांना फटका राज्यात २९ हजार रोजगार सेवकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सध्या रोहयोमध्ये जवळपास तीन हजार कायमस्वरूपी कर्मचारी असून एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याच्या मागे अकरा कंत्राटी कर्मचारी आहेत. राज्य अध्यक्ष, सहायक कार्यक्रम अधिकारी चंद्रकांत दलाल, सतीश वाढई, तांत्रिक सहायक राज्याध्यक्ष आशिष पानतावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.