आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलनाची धग:‘अग्निपथ’चे महाराष्ट्रालाही चटके, अनेक ठिकाणी मोर्चा काढून योजनेला विरोध; रेल्वे वेळापत्रक कोलमडले

औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैन्यभरतीसंदर्भातील अग्निपथ योजनेला विरोध करताना उत्तर भारतातील बिहार आणि दक्षिण भारतातील सिकंदराबादमध्ये हिंसक वळण लागले. या आंदोलनाचे चटके आता महाराष्ट्रातही जाणवत असून शनिवारी नागपूर, मालेगाव (जि.नाशिक), अकोल्यासह अनेक शहरांत आंदोलन करण्यात आले. संतप्त जमाव रेल्वेला लक्ष्य करत असल्याने मध्य रेल्वेच्या सात महत्त्वपूर्ण प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक गाड्यांचे मार्ग बदलले, तर काही गाड्या १५ ते १८ तास विलंबाने धावत आहेत. यामुळे रेल्वेचे आणि प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

अकोल्यात अग्निपथला विरोध, राहुल गांधींना समर्थन : अकोला येथे काँग्रेसची विद्यार्थी आघाडी एनएसयूआयने शनिवारी दुपारी निदर्शने करीत आंदोलन केले. यात युवक काँग्रेसचे पदाधिकारीही सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. हे आंदोलन प्रदेशाध्यक्ष आमिर शेख यांच्या आदेशावरून व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष अंकुश तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आंदोलकांनी डाबकी राेडवर हातात फलक घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले
अग्निपथ योजनेला विरोध, तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील ‘ईडी’ कारवाईचा निषेध करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या शहर कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला. कार्यालयासमोर आंदोलन केल्याने भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी अखेर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

नागपूर : आंदोलक आक्रमक
नागपुरात युवक काँग्रेसने शनिवारी आक्रमक आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौकात काही काळ ठिय्या आंदोलन करीत वाहतूक रोखली होती. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. झीरो माइल्सपासून युवक काँग्रेसने रॅली काढली. मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत संविधान चौकात रस्ता रोखून धरला.

नाना पटोलेंकडूनही विरोध
या आंदोलनापूर्वी मुंबईत राजनंदिनी दळवी अकॅडमीच्या प्रशिक्षक व युवकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन अग्निपथ योजना रद्द करावी, या मागणीचे निवेदन दिले. या वेळी पटोले यांनीही या योजनेला काँग्रेसचाही विरोध असल्याचे सांगितले. अशा सैन्यभरतीमुळे तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे. काँग्रेस तरुणवर्गावर अन्याय होऊ देणार नाही. आम्ही तरुणांसोबत आहोत. केंद्र सरकारने लादलेली अग्निपथ योजना मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

मालेगावात मोर्चा, निदर्शने
शनिवारी सकाळी शेकडो तरुणांनी संघटितपणे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. येथे जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. अग्निपथ योजना रद्द करण्याची मागणी करून प्रशासनाला निवेदन दिले. शहर व तालुक्यातील तरुणांनी कॉलेज मैदानापासून मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या देत अग्निपथ योजनेला कडाडून विरोध केला. तरुणांचा संताप पाहता अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी केंद्र सरकारकडे आपल्या भावना कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर तरुण परतले.

रेल्वेच्या ७ गाड्या रद्द, अनेक गाड्यांना १५ तासांपर्यंत उशीर
आंदोलक रेल्वेसह सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करत असल्याने रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहेत. शनिवारी भागलपूर-कुर्ला रेल्वे रद्द करण्यात आली. हावडा-मुंबई मेल सहा तास तर देवगिरी एक्स्प्रेस १२ तास आणि कामाख्या कुर्ला ९ तास विलंबाने धावत होती. साईनगर-सिकंदराबाद एक्स्प्रेस रद्द केली. जम्मू तावी - पुणे झेलम एक्स्प्रेस आणि निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस दोन तास विलंबाने धावत होत्या. दानापूर-पुणे एक्स्प्रेस गाडी रद्द केली.

भुसावळ विभागातही गाड्या रद्द बिहारमध्ये संतप्त आंदोलकांनी १२ रेल्वेगाड्या जाळल्या आहेत. आंदोलक रस्त्यावर उतरल्याने देशाच्या अनेक भागांत रेल्वे प्रशासनाने २०० प्रवासी गाड्या रद्द केल्या. त्याचा मोठा फटका रेल्वेच्या भुसावळ विभागात बसला. भुसावळ मनमाडमार्गे परप्रांतातून मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या, याशिवाय दक्षिण भारतातून मनमाडमार्गे शिर्डी येथे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्यांचे मार्ग वळवले तर काही गाड्या १५ ते १६ तासांच्या विलंबाने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार दानापूर-पुणे, लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला पाटलीपुत्र एक्स्प्रेस, नगर-मनमाड एक्स्प्रेस, मनमाड-सिकंदराबाद, मनमाड अजंता एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस या महत्त्वपूर्ण प्रवासी गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागातून मनमाडमार्गे सिकंदराबाद-साईनगर शिर्डी येथे येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

बातम्या आणखी आहेत...