आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाट धुक्याची चादर:एअर इंडियाचे औरंगाबाद-मुंबई विमान रद्द, दिल्लीस 5 तास उशीर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात शुक्रवारी सकाळपासून दाट धुके पडल्याने दृश्यमान्यता अवघी ५०० मीटरवर अाली हाेती. चिकलठाणा परिसरात दाट धुक्याची चादर पसरली हाेती. हवामान खराब असल्याने एअर इंडियाचे औरंगाबादहून मुंबईला जाणारे सकाळी ८.५० वाजेचे विमान रद्द करण्यात आले. चिकलठाणा विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारल्याने सुमारे ४५ मिनिटे घिरट्या घालून विमान मुंबईला परत गेले. दिल्लीहून सकाळी ७.४० वाजता निघालेले विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. अखेर पाच तासांनंतर दुपारी बारा वाजता दिल्लीला जाणारे विमान चिकलठाणा विमानतळावर धुके कमी झाल्यानंतर उतरले. मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवाशांना दिल्लीमार्गे जावे लागले, तर काहींनी तिकीट रद्द केले. दुसरीकडे चिकलठाणा विमानतळावरून इंडिगोची विमानसेवा सुरळीत सुरू होती. एअर इंडियाच्या सेवेलाच अडचण कशी अाली, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला.

एअर इंडियाचे मुंबईसाठी सकाळी ७.४० वाजता विमान होते. पन्नासपेक्षा जास्त प्रवासी सकाळी ६ वाजता पोहोचले, तेव्हा मुंबईहून विमान निघाल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु खराब हवामान आणि धुके जास्त असल्यामुळे विमान केवळ शहरावर घिरट्या घालत राहिले. सकाळी ११ वाजेपर्यंत चिकलठाणा विमानतळावर प्रवाशांना बसवून ठेवले. अखेर मुंबईचे विमान घिरट्या घालून परत गेले, परंतु प्रवाशांना काहीच सांगण्यात आले नाही. बसद्वारे मुंबईला सोडण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगताच प्रवासी संतापले. तेव्हा पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मुंबईला जाणाऱ्यांमध्ये अनेकांनी वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांची वेळ घेतली होती. काही रुग्ण व्हीलचेअरवर होते. काही प्रवाशांना मुंबईहून अरब देशांचे विमान पकडायचे होते.

प्रवाशांनी घातला वाद सकाळी ६.३० पासून शंभरावर प्रवासी विमानतळावर येऊन बसले होते. दिल्लीहून येणारे ८.३० चे विमान हवामान खराब असल्याने अहमदाबादकडे वळवल्याचे सांगण्यात आले. दुपारी १२ नंतरही विमान येत नसल्याने प्रवाशांनी एअर इंडियाच्या व्यवस्थापकांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. अखेर दुपारी १२ नंतर विमान आले. दुपारी १२.३० वाजता ते विमान दिल्लीकडे रवाना झाले. मुंबईला जाणे ज्यांना अत्यावश्यक होते त्यांना या विमानाने पाठवण्यात आले.

इंडिगोची सेवा सुरू, एअर इंडियालाच अडचण कशीॽ इंडिगोच्या हैदराबादच्या दोन विमानांना अडचण नव्हती. मुंबई आणि दिल्लीची इंडिगोची विमाने गेली, तेव्हा केवळ एअर इंडियालाच हवामानाची अडचण कशी काय आली? मला महत्त्वाच्या बैठकीसाठी मुंबई गाठायचे होते. बसने सोडण्याचा पर्याय चुकीचा आहे. किमान हवामान सुधारल्यावर विमान पाठवायला हवे. आता दिल्लीमार्गे मुंबई गाठावी लागली. - विमल शहा, व्यावसायिक

मुंबईच्या प्रवाशांना दिल्लीमार्गे पाठवले : हवामान खराब असल्याने एअर इंडियाला औरंगाबाद ते मुंबई विमान रद्द करावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून मुंबईच्या प्रवाशांना दिल्लीमार्गे पाठवले. दिल्लीचे विमान दुपारी साडेबारा वाजता रवाना झाले. काही प्रवाशांनी आपले तिकीट रद्द केले. - मीनाक्षी भाजीपाले, व्यवस्थापक, एअर इंडिया औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...