आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार परिषद:विमानतळ विस्तारीकरणात बाराशेऐवजी सव्वाशेच घरे बाधित होणार : डॉ. कराड; आगामी तीन महिन्यांत विमानतळाची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण करणार

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिकलठाणा विमानतळ विस्तारीकरणासाठी १८२ एकर ऐवजी आता १४७ एकर जमिनीची आवश्यकता आहे. पूर्वीच्या आराखड्यानुसार १२०० घरांचा अधिग्रहणात समावेश होता. परंतु, आता नव्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार केवळ १२५ घरेच बाधित होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी म्हाडा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच म्हाडा गरिबांच्या बांधत असलेल्या घरांसाठी तीन लाख उत्पन्नासाठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अट केंद्राकडून शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले. दौलताबादसाठी ३५ कोटी तर बीबी का मकबऱ्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

आपण केवळ निवेदनाचे कागद काळे केले नसून विकासकामे खेचून आणल्याचे पत्र सादर करीत असल्याने पोकळ गप्पा मारत नसल्याचे सांगत माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. तीन महिन्यांत विमानतळाची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दौलताबाद किल्ला येथे सुशोभीकरण आणि लाइट अँड साउंड शोचे आयोजन केले जाणार आहे.

यासाठी ३५ कोटी अंतिमत: मंजूर झाले असून पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे जिल्हास्तरीय समिती बनवून अहवाल सादर केला जाईल. बीबी का मकबरा परिसरात विद्युत रोषणाई केली जाईल, यासाठी साडेसात कोटी मंजूर केले आहेत. पाच वर्षांच्या देखभाल- दुरुस्तीची अट नव्याने समाविष्ट करण्यात आली आहे. पर्यटन वाढीसाठी दोन प्रकल्प महत्त्वाचे असून राज्यसभा सदस्य झाल्यापासून पाठपुरावा करीत असल्याचे कराड यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजप प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, म्हाडा सभापती संजय केणेकर, भाजप प्रदेश अेबीसी आघाडीचे सरचिटणीस भगवान घडमोडे, माजी नगरसेवक रामेश्वर भादवे, राम बुधवंत, सिद्धार्थ साळवे, दीपक ढाकणे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...