आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआठवा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे ११ ते १५ जानेवारीदरम्यान होणार आहे. याचे उद्घाटन ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता हाेईल. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र औरंगाबाद प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा-वेरूळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल राज्य शासनाच्या सहकार्याने हाेणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाची सहप्रस्तुती राहील. नाथ स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कूल ऑफ फिल्म आर्ट्स या महोत्सवाचे अकॅडमिक पार्टनर आहेत.फेस्टिव्हलचा समारोप १५ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता हाेईल.
मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रॉडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश आहे.
२५ कॉलेजांत २० डिसेंबरपासून चित्रपट रसग्रहण कार्यशाळा महोत्सवात मराठवाड्यातील कलाकारांसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्युरी कमिटीने निवडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवादरम्यान दाखवण्यात येतील. यातील सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्मला २५,००० रुपये रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलास पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. याकरिता औरंगाबाद शहरात २५ महाविद्यालयांत चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे २० डिसेंबर ते १० जानेवारीदरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी www.aifilmfest.in किंवा info@aifilmfest.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे आदींनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.