आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशरद पवारांनी घेतलेला निर्णय हा दोन दिवसांत झालेला नाही. पण येत्या दोन दिवसांत त्यांची कन्या सुप्रिया सुळेंचे भवितव्य मात्र ठरू शकेल. केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं राजकारण शरद पवारांएवढं कुणालाच समजलेलं नाही. जो माणूस दोन मिनिटांत राजकारणाची दिशा बदलू शकतो, त्याने पुढील निर्णय घेण्यासाठी दोन दिवस मागितलेत. हा काळ फक्त अजित पवारांसाठी नव्हे तर सुप्रियांच्या भविष्यासाठीही खूप महत्त्वाचा असेल.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होऊन पवारांनी स्वत:चा डाव जाहीर केला खरा; पण आता ते पक्षाच्या कॅप्टनप्रमाणेच सलेक्टरच्याही भूमिकेत असतील. अजित पवारांच्या ‘राज्यात’ सुप्रियांचं राजकीय भविष्य सुरक्षित राहील का, याचा पूर्णपणे विचार करूनच शरदराव पुढचा निर्णय घेतील. पक्षाचा प्रमुख यापेक्षा एक पिता म्हणून त्यांचा हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्यातील राजकारणी इतक्या सहजासहजी निवृत्त होणार नाही, हे तितकेच खरे. पवार बोलत असताना सुप्रिया या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये जाऊन बसल्या होत्या. पुढील राजकीय जीवनात त्यांना असेच कार्यकर्त्यांमध्ये रांगेत बसवायचे की एखादी खुर्ची मिळवून द्यायची हे पवारांच्या निर्णयावर अवलंबून असेल.
निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये भावनिक लाट निर्माण होईल हे पवार जाणून होतेच. आता याच सहानुभूतीच्या लाटेला कोणती द्यायची हे पवारच ठरवू शकतील. या सहानुभूतीमुळे शरद पवारांचे पक्षातील पारडे पूर्वीपेक्षाही जास्त बळकट झाले आहे. पण आता त्यांची कसोटी एक राजकारणी म्हणून नव्हे तर पिता म्हणून लागणार आहे. म्हणूनच त्यांच्या पुढील निर्णयावर 'पित्या'चा प्रभाव जास्त दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच राष्ट्रवादीत पुढच्या दोन दिवसात प्रत्येक दोन मिनिटाला राजकारणाचा खेळ बदलू शकतो.
प्रणव गोळवेलकर, राज्य संपादक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.