आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंधन महागाईच्या निषेधार्थ सोमवारी मोदी सरकारविरोधात मोर्चाची घोषणा काँग्रेसने केली होती. मात्र ऐनवेळी गांधी पुतळ्याजवळ निदर्शने केली. केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चा रद्द का केले, या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसल्याचे सांगितले. प्रत्यक्षात मोर्चाची परवानगी मागितलीच नव्हती, असे सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी म्हणाले.
दरम्यान, दिव्य मराठी प्रतिनिधीने विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सीएनजीप्रमाणे पेट्रोल २० रुपयांनी स्वस्त करावे, अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आमदार नामदेवराव पवार, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, इब्राहिम पठाण, महिला जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, महिला शहराध्यक्ष अंजली वडजे, युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सागर नागरे, संदीप बोरसे या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘भाजप नेते कायम सत्तेत आल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेच्या प्रश्नांविषयी गांभीर्य राहिलेले नाही. मात्र जनता त्यांना सत्तेवरून खाली उतरवून जागा दाखवेल,’ अशी टीका काळे यांनी केली. ‘सस्ती दारू महंगा तेल, वा रे मोदी तेरा खेल’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. ‘पेट्रोल-डिझेल शंभरी पार, मोदी बस करा जनतेची लूटमार’ असे फलकही झळकावण्यात आले. गॅस सिलिंडरला ‘श्रद्धांजली’ वाहून व चूल पेटवून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला.
मोर्चाला सशर्त परवानगी देता आली असती : पोलिस
‘मोर्चा रद्द का केला?’ या प्रश्नावर कल्याण काळे म्हणाले, ‘आम्ही मोर्चासाठी पोलिसांकडे पत्र दिले होते, त्याची इनवर्ड कॉपीही आमच्याकडे आहे. पण पोलिस आयुक्त व इतर अधिकाऱ्यांनी आम्हाला मोर्चा न काढता फक्त निदर्शने करण्याची विनंती केली. पोलिसांना सहकार्याची आमची भूमिका असल्याने आम्ही फक्त धरणे आंदोलन केले.
पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘काँग्रेसने मोर्चा काढणार असल्याचे फक्त माहितीस्तव पत्र आमच्या पोलिस ठाण्याला दिले होते. यात कुठेही मोर्चासाठी परवानगी मागितली नव्हती. त्यांनी तशी विनंती केली असती तर सशर्त परवानगी देण्यास काहीच अडचण नव्हती.
मोर्चाची घोषणा, प्रत्यक्षात निदर्शने, पोलिसांवर खापर फोडले
सीएनजीच्या स्वस्ताईचा फॉर्म्युला इंधनाला लावा; काँग्रेसचा अजितदादांना सल्ला
नोव्हेंबरमध्ये मोदी सरकारने उत्पादन शुल्कात कपात गेल्यामुळे पेट्रोलचे दर ५ रुपयांनी, तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर अनेक राज्यांनीही व्हॅट कपात केल्यामुळे त्या राज्यांत इंधन काहीसे स्वस्त झाले. महाराष्ट्राने मात्र व्हॅट कमी करण्यास नकार दिला होता. दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात सीएनजी व पीएनजीवरील कर कमी केला. त्यामुळे त्याच्या दरात अनुक्रमे सहा व तीन रुपये कपात झाली. या पार्श्वभूमीवर राज्याने पेट्रेाल-डिझेलवरील व्हॅट कमी करून किमान २० रुपये इंधन स्वस्त करावे, अशा अपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनानंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केल्या.
सीएनजीपेक्षा पेट्रोल-डिझेल स्वस्त होणे गरजेचे
सीएनजीपेक्षा पेट्रोल-डिझेलचा वापर जास्त होतो. त्यामुळे अजित पवारांनी राज्याचा टॅक्स कमी करून किमान दहा ते वीस रुपयांनी हे इंधनही स्वस्त केले पाहिजे. - जगन्नाथ काळे, प्रशासक, कृषी उत्पन बाजार समिती
औरंगाबादेत पेट्रोलवरील अतिरिक्त सेझ रद्द करा
औरंगाबादमध्ये पेट्रोलवर अनेक वर्षांपासून लावलेला अतिरिक्त ‘सेझ’ रद्द करण्याची गरज आहे. केंद्र, राज्य सरकारनेही कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. - किरण पाटील डोणगावकर, सरचिटणीस, काँग्रेस
पेट्रोलचा दर शंभर रुपयांच्या आतच हवा
राज्य सरकारने सीएनजीवरील कर कमी केले, पण त्याचा वापर जास्त होत नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. - मुझफ्फर खान, युवक काँग्रेस
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.