आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरणानंतरही वाढता लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाकडून गावोगाव माझा गोठा, स्वच्छ गोठा ही मोहीम नोव्हेंबर महिना ते 6 डिसेंबर या कालावधीत राबवली जात आहे. लस मात्रा, औषधी, किटकनाशके व इतर साधनसामग्री जिल्हा स्तरावरून उपलब्ध करुन देण्यात येणार असून यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी मिळणार आहे.
लोकप्रतिनिधी, ग्रामविकास, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी, खासगी पशुचिकीत्सक व सेवादाता यांचा या मोहीमेसाठी सहभाग घेण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा पंडित आणि सर्व विभाग प्रमुख प्रयत्न करत आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लम्पी रोगामुळे पशुसंवर्धन विभागासह शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 5849 जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. त्यातील 437 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मागील महिन्यांत सलग पाऊस सुरू असल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. दुसरीकडे 100 टक्के लसीकरण होऊनही सध्या बाधित जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या संसर्गाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने राज्यात पशुसंवर्धन विभागाने माझा गोठा, स्वच्छ गोठा ही मोहीम सुरू केली आहे. जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील बाधीत शहरे, गावे, वाड्यावस्त्या, पाडे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लम्पी पशुपालकांना जैव सुरक्षा उपाय व अनुषंगीक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
मोहीम कालावधीमध्ये बाधीत गावांमध्ये गोठा भेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पथके तयार केली जाणार असून एका पथकामध्ये 1 पशुवैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीकडील 2 स्वयंसेवक असतील. हे पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देणार आहे. गोठाभेटीव्दारे लंपीसदृष्य लक्षणे असणाऱ्या गोधनास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये तात्काळ नेण्यात येईल व तेथे आवश्यक उपचार होणार आहे. असे डॉ. पंडित यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.