आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विरोधकांकडून होणारे आरोप निरर्थक; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे मत

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधकांकडून केले जात असलेले आरोप निरर्थक असून ईडी, इन्कम टॅक्स या तपास यंत्रणा सर्व स्वायत्त आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही. त्यांच्याकडे पुरावे असतात. पुराव्यानिशी ते कारवाई करीत असतात. तसेच आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. यात कुठलंही राजकारण होत नाही. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यांच्या कुटुंबावर कारवाई व्हावी असे आम्हाला वाटत नाही, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले यांनी परभणीत शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. या वेळी रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भालेराव, जिल्हाध्यक्ष डॉ. विजय गायकवाड, पप्पू कागदे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरले असून एकमेकांवर कुरघोड्या करण्यातच पक्षांचे नेते गुंतलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे.

अडीच-अडीच वर्षांच्या जुन्या फार्म्युल्यावर एक असल्यास भाजपदेखील तयार होईल, असे आठवले यांनी सांगितले. शिवाय केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन चालणारे असल्यानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी रिपाइं पक्ष भाजपसोबत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही रिपाइं भाजपला पाठिंबा देणार आहे.

तिळगूळ घ्या, गोड गोड बोला
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले हे नेहमी आपल्या कवितांमुळे चर्चेत असतात. त्यांनी परभणीत परिषदेच्या सुरुवातीला “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, तिळगुळाचा दिवस वेगळा आहे. आज पाडवा आहे. आपल्या आनंदाची, विजयाची गुढी उभारण्याचा आजचा दिवस आहे,’ असे म्हणत त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...