आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मुळ गावी जाण्याची परवानगी द्या, आमदार सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे अनेक शहरातील विद्यार्थ्यांच्या मेस बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने आता 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुणे, औरंगाबाद सारख्या शहरात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. यातील अनेक विद्यार्थी आज ‘लॉकडाऊन’मुळे  पुणे, औरंगाबाद शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज शासनाने ऊसतोडणी कामगारांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्याबाबत निर्णय घेतला. त्याच प्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांसंदर्भात देखील असा निर्णय घेणे गरजेचे आहे. मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी औरंगाबाद शहराची निवड करीत आहेत. औरंगाबाद प्रमाणेच पुणे, दिल्लीत देखील ‘यूपीएससी’, ‘एमपीएससीची’ तयारी करणारे अनेक विद्यार्थी ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडले आहेत. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ‘मेस’ बंद झाल्या आहेत. जे विद्यार्थी हाताने स्वयंपाक करून खातात त्यांच्याकडील पैसे व किराणा साहित्य संपले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी मला संपर्क करून आम्हाला आमच्या मुळ गावी जाण्यासाठी मदत करण्याची विनंती करीत असल्याचे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे.

त्यामुळे ऊसतोडणी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना मुळ गावी जाण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या मुळ गावी जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...