आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज होणार फैसला:विद्यापीठात चार पॅनल असले तरी ‘उत्कर्ष’ आणि ‘मंच’मध्येच फाइट

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेच्या २५, विद्या परिषदेच्या ६ जागांसाठी मंगळवारी (१३ डिसेंबर) सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. कॉलेज प्राध्यापक, विद्यापीठ प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक आणि विद्या परिषदेच्या ६ मतदारसंघांसाठी ८९ उमेदवार आहेत. अधिसभेत ७०, तर विद्या परिषदेसाठी १९ जण रिंगणात आहेत. चार पॅनल असले तरी मैदानात प्रमुख दोनच पॅनलमध्ये लढत होणार आहे. यात अभाविपप्रणीत विद्यापीठ विकास मंच आणि राष्ट्रवादीप्रणीत उत्कर्षचा समावेश आहे. पदवीधर अधिसभेत यापूर्वीच १० उमेदवार निवडून आले आहेत.

उत्कर्ष-८, उद्धवसेना आणि मंचला त्यातील प्रत्येकी एक जागा मिळाली. आता २९ अधिसभेपैकी रमेश आडसकर यांच्या पत्नी अर्चना चव्हाण आणि अनुसूचित जमातीतून नितीन जाधव हे संस्थाचालक मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाले. प्राचार्यांतील महिला उमेदवाराची जागा रिक्त आहे. डॉ. शिवदास शिरसाट बिनविरोध विजयी झाले. त्यामुळे २५ जागांसाठी ७० जणांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. उत्कर्ष आणि मंचला टक्कर देण्यासाठी माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विलास खंदारे यांचे परिवर्तन पॅनल आणि डॉ. शंकर अंभोरे यांच्या स्वाभिमानी मुप्टानेही उमेदवार दिले. महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या खुल्या ५ जागांवर रंगतदार लढती दिसून येतील. राखीवच्या ५ जागांवर उत्कर्ष नेहमीप्रमाणे वर्चस्व राखण्याची शक्यता आहे. बामुक्टो व बामुक्टा या संघटनांचे यंदा उत्कर्षला समर्थन आहे. बामुक्टोला विक्रम खिल्लारे, संजय कांबळे यांंच्या रूपाने दोन जागा दिल्या आहेत.

विद्या परिषदेसाठी काट्याची टक्कर संस्थाचालक मतदारसंघाच्या ६ पैकी २ जागा बिनविरोध आल्या आहेत. उर्वरित ४ पैकी संजय निंबाळकर आणि बसवराज मंगरुळे हे विजयाच्या जवळ आहेत. राहिलेल्या २ जागांसाठी गोविंद देशमुख, डॉ. मेहर दत्ता पाथ्रीकर, आश्लेष मोरे, किशोर हंबर्डे, राहुल म्हस्के आणि विनायक चोथे यांच्यात लढत होईल. विद्यापीठ प्राध्यापक गटाच्या ३ जागांसाठी ९ जण रिंगणात आहेत. खुल्या जागेसाठी डॉ. सतीश दांडगे, डॉ. संजय साळुंखे यांच्यात लढत होईल. विद्या परिषदेत एकूण ८ निर्वाचित जागांपैकी २ रिक्त राहिल्या आहेत. ६ जागांसाठी १९ जण रिंगणात आहेत.

६ मंडळांना एकही लायक प्राध्यापक भेटला नाही ४ विद्याशाखांतील ३८ अभ्यास मंडळांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. मानव्यविद्या (१३), विज्ञान व तंत्रज्ञान (१३), वाणिज्य व व्यवस्थापन (५) तर आंतरविद्याशाखेतील (७) आदींचा समावेश आहे. उर्दू, मानसशास्त्र, मत्स्यशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, प्राणिशास्त्र, एमबीए, बीपीएड, शैक्षणिक प्रशासन, शैक्षणिक तत्त्वज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक या १३ अभ्यास मंडळांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. स्टेन्टिव्ह लॅप, प्रोसिजर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि एमसीए या ६ अभ्यास मंडळांना एकही पात्र प्राध्यापक उमेदवार भेटू शकला नाही. उर्वरित १९ अभ्यास मंडळांसाठी १२४ उमेदवार रिंगणात होते. त्यांना १,२४३ मतदारांनी मतदान केले.

बातम्या आणखी आहेत...