आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंभाजीनगर- गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालना व संभाजीनगर जिल्ह्यात आज केलेल्या पीक नुकसानीच्या पाहणीत अनेक ठिकाणी पंचनामेच झाले नसल्याचे समोर आले आहे.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले असतानाही अद्याप नुकसानीचे पंचनामेच झाले नसल्याचे शेतकऱ्यांनी दानवे यांना सांगितले. आज दानवे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका, ढोपटेश्वर शिवार येथील शेतकरी नाथाराम शेळके यांच्या शेतातील डाळिंब फळांचे नुकसानाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली.तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील देमनी वाहेगाव,शिवार तालुका शेकटा येथील नुकसानग्रस्त शेतकरी साईनाथ तांगडे यांच्या शेतातील बांधावर जाऊन गहू, हरभरा पिकाच्या नुकसानीची पाहणी अंबादास दानवे यांनी केली.
उभी पिके हाताला आलेली असताना अवकाळी पावसामुळे डाळींब, मोसंबी ही फळे व हरभरा, गहू पिके नष्ट झाली आहेत. आता दुसरे पिक घेण्यासारखीही स्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना 33 टक्के नुकसानीचे निकष न लावता सरसकट मदत द्यावी, अशा सूचना दानवे यांनी संबंधित तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिल्या. एकीकडे शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांवर अस्मानी संकटाने घाला घातला आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. सततच्या पावसाची मदत अद्याप मराठवाड्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाली नाही. याबाबत शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सभागृहात आवाज उठवणार असल्याची ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
यावेळी कृषी अधिकारी बनसोडे तथा तहसीलदार सुमन मोरे व शिवसेना पदाधिकारी माजी आमदार संतोष सांबरे, भास्कर आंबेकर प्रमुख, जयप्रकाश चव्हाण उपजिल्हाप्रमुख, भगवानराव कदम किसान सेना तालुका, अध्यक्ष नंदू दाभाडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.