आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना भोवण्याची शक्यता आहे. एकीकडे या प्रकरणी अंधारे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारेंबाबत केलेले वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि क्रिमिनल लॉमध्ये बसणारे आहे. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिस ठाण्यात दिले आहे.
दानवेंनी दिली तक्रार
२६ मार्च रोजी आमदार संजय शिरसाठ यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध अत्यंत अवार्च्य भाषेत टीका केली असल्याचे माध्यमातून समोर आले. त्यामुळे शिरसाट यांच्या विरोधात भा.दं. वि. च्या कलम ३५४ (अ) अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अंबादास दानवे यांनी लेखी स्वरूपात केली आहे.
काय म्हणाले शिरसाट?
आमदार संजय शिरसाट यांची सुषमा अंधारे यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, 'ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत म्हणते. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत. अरे पण तू आहे तरी कोण? आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवत आहेत.'
दानवे आपल्या संपर्कात
संजय शिरसाट पुढे म्हणाले होते की, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. यावेळी त्यांची सुभेदारी विश्रामगृहात राहण्याची व्यवस्था केली होती. याची अंधारे यांनी मातोश्रीवर तक्रार केली होती. तेव्हा अंबादास दानवेंना मातोश्रीवरून फोन आला आणि अर्ध्यातासात अंधारे यांची व्यवस्था रामा हॉटेलमध्ये करण्यात आली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. अंबादास दानवे माझ्या संपर्कात असून, कधीही काही होऊ शकते. सुषमा अंधारे डोक्याच्यावर झाल्या आहेत, असे अंबादास दानवे यांनी फोनकरून सांगितल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला होता.
मंत्र्यांकडून महिलांचा अपमान
अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारकडून महिलांचा वारंवार अपमान सुरू आहे. यापूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत असेच वक्तव्य केले. आता संजय शिरसाट सुषमा अंधारे यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलले. राज्य सरकार अशा महिलांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना संरक्षण कसे देते, असा सवालही त्यांनी केला.
पोकळ गप्पा सुरू
मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे भेटत नव्हते, अजित पवार त्रास द्यायचे असा आता आरोप करतात. मात्र, या पोकळ गप्पा आहेत. त्यांच्या मनात गद्दारीचे बीज सुरुवातीपासूनच पेरलेले होते. त्यामुळे त्यांनी गद्दारी केले. आता उद्धव ठाकरे भेटत नव्हते, अजित पवार निधी द्यायचे नाहीत, असा बकवास सुरू असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.