आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगती:ऑरिक सिटीत अमेरिकन आयटी कंपनी दाखल, पहिल्या टप्प्यात 200 तर पुढील 2 वर्षांमध्ये 1 हजार रोजगार

छत्रपती संभाजीनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासदार इम्तियाज जलील, सीएमआयएच्या पुढाकारामुळे कंपनीने हैदराबाद, बंगळुरूएेवजी केली छत्रपती संभाजीनगरची निवड
  • 700 कोटींची गुंतवणूक, चार हजार चौरस फूट जागा भाडेतत्त्वावर घेतली, जूनपासून नियमितपणे होणार काम सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून ऑरिक सिटीला अपेक्षित असलेला प्रतिसाद हळूहळू मिळत आहे. अमेरिकेतील अॅल्ड्रिच सर्व्हिसेस ही आयटी क्षेत्रातील कंपनी ऑरिकमध्ये दाखल होत आहे. ती येत्या काही वर्षांत सुमारे ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. त्यात पहिल्या टप्प्यात २०० तरुणांना रोजगार मिळणार आहे. दोन वर्षांमध्ये किमान १००० जणांना प्रत्यक्ष नोकरीची संधी मिळू शकेल. सीएमआयए आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या विशेष पुढाकाराने या कंपनीने हैदराबाद, बंगळुरूऐवजी छत्रपती संभाजीनगरची निवड केली आहे.

अॅल्ड्रिचची पायाभरणी साधारणत: दीड वर्षापूर्वी झाली. खासदार इम्तियाज यांची एका संस्थेतर्फे अमेरिकेतील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती. तेथे त्यांची मूळ हैदराबाद आणि आता अमेरिकेत स्थायिक झालेले आयटी उद्योजक मिर्झा बेग यांची भेट झाली. बेग व्यवस्थापकीय भागीदार असलेल्या अॅल्ड्रिच कंपनीची एक शाखा हैदराबादेतही आहे. त्यांचे आणि इम्तियाज यांचे वडील मित्र होते. चर्चेत बेग यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार हैदराबाद परिसर आणि बंगळुरू येथे करण्याचा मानस व्यक्त केला.

सर्वांच्या प्रयत्नाने रोजगार निर्मिती
आॅरिकमध्ये उद्योग यावेत, अशी माझी अनेक वर्षांची तळमळ होती. म्हणून मी अॅल्ड्रिचच्या व्यवस्थापनाकडे मनापासून पाठपुरावा केला. पहिल्या टप्प्यात २०० जणांना थेट काम मिळणार आहे. सर्वांच्या प्रयत्नाने येथे रोजगार निर्मिती शक्य आहे, एवढेच माझे म्हणणे आहे. इम्तियाज जलील, खासदार

होय, नव्या कंपनीचे पाऊल पडले आहे
आॅरिक सिटीमध्ये एक नव्या आयटी कंपनीचे पाऊल पडले आहे आणि या कंपनीचे काम आता प्रगतिपथावर आहे. - नितीन गुप्ता, अध्यक्ष, सीएमआयए

...तेव्हा आश्वासन दिले होते
भेटीत मिर्झा बेग यांंना ऑरिकचा विचार करावा, अशी विनंती इम्तियाज यांनी केली. एवढेच नव्हे तर भारतात परतल्यावर त्यांना आॅरिक सिटी पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार गेल्या वर्षी ते आले. त्यांच्यासमोर इम्तियाज यांनी ऑरिकची बलस्थाने मांडली. ती मान्य करून बेग यांनी हैदराबाद, बंगळुरूऐवजी छत्रपती संभाजीनगरचा विचार करू, असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर फेब्रुवारी २०२३मध्ये कामाला सुरुवात करण्याची तयारीही दाखवली.

१६ एकर जागेचा प्रस्ताव पाठवला
अॅल्ड्रिचने छत्रपती संभाजीनगरची निवड केली. पहिल्या टप्प्यात आॅरिक सिटी हॉलमध्ये सुमारे ४००० हजार चौरस फुटांची जागा भाडेतत्त्वावर घेतली. पीईएस, जेएनईसी, एमआयटीतील मुलाखत सत्रानंतर २०० अभियंत्यांची नियुक्ती अंतिम टप्प्यात आली आहे. जूनमध्ये त्यांचे प्रत्यक्ष काम नियमितपणे सुरू होईल. दरम्यान, कंपनीने १६ एकर जागा खरेदीसाठी डीएमआयसी प्रशासनाला प्रस्ताव पाठवला आहे. या २०० अभियंत्यांनी उत्तम कामगिरी बजावली तर दोन वर्षांत कमीत कमी १००० जणांना संधी देण्याची तयारी अॅल्ड्रिच व्यवस्थापनाने सुरू केली आहे.