आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:ओल्या कचऱ्या पासून तयार होणाऱ्या सेंद्रीय खताच्या विक्रीची रक्कम स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचा निर्णय

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सफाई कर्मचाऱ्यांची तातडीची आर्थिक मदत होणार ः डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली पालिका

हिंगोली शहरातून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मिती करण्यास पालिकेने सुरवात केली आहे. या खताच्या विक्रीतून दरमहा किमान ३५ ते ४० हजार रुपयांची रक्कम हिंगोली पालिकेला मिळू लागली आहे. हा निधी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरला जाणार आहे. या प्रकारचा निर्णय घेणारी हिंगोली पालिका राज्यातील पहिलीच पालिका आहे.

हिंगोली नगर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला असून नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह नगरसेवक व नागरीकांच्या पाठबळावर मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी विविध उपक्रम हाती घेेतले आहेत. या स्वच्छ सर्वेक्षणात पालिका पदाधिकाऱ्यांसह नागरकांनीही सहभाग नोंदविला आहे.

दरम्यान, पालिकेकडून शहर स्वच्छतेसाठी २४ घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. दररोज या घंटागाड्यातून जमा होणारा कचरा डंम्पींग ग्राऊंडवर वेगळा करून त्यातून ओला कचरा वेगळा केला जात आहे. या ओल्या कचऱ्यामध्ये भाजीपाल्यांचे देठ, खराब झालेली फळे, अन्नपदार्थाचा समावेश आहे. या ओल्या कचऱ्या पासून सेंद्रीय खत तयार करून त्याची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दररोज ३ टन ओला कचरा गोळा होत असून त्यातून दर महिन्याला १२ टन सेंद्रीय खत तयार केले जात आहे. या खताची हिंगोली पालिकेने सेंद्रीय खत म्हणून विक्री करण्यास सुरवात केली आहे. या खतापासून पालिकेला दर महिन्याला किमान ३५ ते ४०००० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. विशेष म्हणजे सदर खत हिंगोली शहरातील नागरीकांना त्यांनी घराच्या परिसरात वृक्षलागवड केल्यास केवळ १० रुपये किलो दराने दिले जात आहे.

दरम्यान, या कचऱ्यामध्ये येणाऱ्या ओल्या नारळाच्या करवंट्यांमधे माती भरून त्याद्वारे रोपवाटीका तयार करण्याचा उपक्रम पालिकेने हाती घेतला आहे. या रोपवाटीकेतून होणाऱ्या रोपांची शासकिय कार्यालयांना तसेच नागरीकांना अल्प दरात विक्री केली जाणार आहे. सेंद्रीयखत व रोपांतून मिळणारे उत्पन्न सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बँक खाते काढण्याची तयारी पालिकेने सुरु केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करणारी हिंगोली पालिका राज्यातील पहिलीच नगर पालिका ठरली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांची तातडीची आर्थिक मदत होणार ः डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी हिंगोली पालिका

हिंगोली पालिके अंतर्गत ६९ सफाई कामगार कार्यरत आहेत. शहर स्वच्छतेमध्ये या कर्मचाऱ्यांची मोलाची भुमीका आहे. त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे कठीण होते. त्यामुळे त्यांना वेळीच मदत मिळावी या उद्देशाने ‘स्वच्छता कर्मचारी कल्याण निधी’ या नावाने स्वतंत्र बँक खाते काढून त्यात हि रक्कम जमा केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना गरजेच्या वेळी सदर रक्कम उपलब्ध केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...