आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:वसमतच्या नवोदय विद्यालयातील अकरावीची एक तुकडी रद्द, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फटका बसणार

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता अकरावीची एक तुकडी रद्द केल्याने जिल्ह्यात नवोदय विद्यालय प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या ४० विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. सदरील तुकडी पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

वसमत येथे १९८६ साली जवाहर नवोदय विद्यालयला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी इयत्ता सहावी पासून बारावीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. इयत्ता सहावी ते दहावी यावर वर्ग मधून प्रत्येकी दोन तुकड्या असून यामध्ये ८० विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र अकरावी वर्गामध्ये केवळ ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू लागला होता. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय सोडून जावे लागत होते. त्यामुळे या ठिकाणी एक तुकडी वाढवून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी खासदार राजीव सातव यांच्या कडे केली.

त्यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा यासाठी खासदार सातव यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हिंगोली जिल्ह्यासाठी इयत्ता अकरावी व बारावी साठी एक अतिरिक्त तुकडी मंजूर करून घेतली. विशेष म्हणजे या तुकडीसाठी खासदार निधीतून पाच लाख रुपये देऊन अद्ययावत वर्गखोली देखील बांधून देण्यात आली. त्यामुळे सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीला ८० विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ लागले.

मात्र त्यानंतर आता अचानक नवोदय विद्यालयाच्या पुणे येथील समितीने वसमत येथील इयत्ता अकरावी मधील एक तुकडी रद्द केली आहे. त्यामुळे आता नवोदय विद्यालयात अकरावीसाठी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. नवोदय विद्यालय समितीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून चुकीचा असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

यासंदर्भात नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एन. लक्ष्मणन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इयत्ता अकरावी साठी या वर्षी केवळ २६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे उर्वरित तुकडी रद्द झाली असावी असे सांगितले. पुढील वर्षी विद्यार्थी संख्या वाढल्यास पुन्हा तुकडी येऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले. इयत्ता दहावी नंतर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी इयत्ता अकरावीला नवोदय विद्यालय मधे प्रवेश न घेता इतर ठिकाणी प्रवेश घेत असल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जवाहर नवोदय विद्यालय मधील इयत्ता दहावीचे उत्तीर्ण विद्यार्थी इयत्ता अकरावी मध्ये नवोदय विद्यालयात का थांबत नाहीत हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. यावर्षी ८० विद्यार्थ्यांपैकी केवळ २६ विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला असून इतर १४ विद्यार्थी बाहेरून प्रवेश घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. सदर प्रवेश प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.