आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:रोही प्राण्याने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचार सुरु असताना मृत्यू

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • कान्होजी मुकाडे हे कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मूळचे रहिवाशी आहे

कळमनुरी शहराजवळ रोही प्राण्याने दुचाकीस धडक दिल्याने जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. 7 रात्री घडली आहे. कान्होजी रामचंद्र मुकाडे (52) असे त्यांचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगांव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले कान्होजी मुकाडे हे जानेवारी महिन्यात सेनगाव येथून कळमनुरीकडे दुचाकी वाहनावर जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कळमनुरी शहराजवळ आले असताना अचानक रोही प्राण्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये मुकाडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या पोटाला ही गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळमनुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मुकाडे यांना उपचारासाठी हिंगोली येथील रुग्णालयात हलवले.

हिंगोली येथे खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या पोटावर शस्त्रक्रियाही झाली होती. त्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी ही दिली जाणार होती. मात्र बुधवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान कळमनुरी तालुक्यातील जांब येथील मूळचे रहिवाशी असलेले कान्होजी मुकाडे हे सन 1983-84 परभणी जिल्हा पोलिस दलात भरती झाले होते. अत्यंत शिस्तप्रिय कर्मचारी त्यांची ओळख होती.

परभणी जिल्ह्यातील पाथरी, पूर्णा या पोलिस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी पोलीस ठाण्यात त्यांनी काम केले. त्यानंतर सध्या ते सेनगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गुंतागुंतीचे तपास लावण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले मध्येही त्यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...