आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसमावेशक भूमिका:मविआच्या सभेत ठाकरेंकडून हिंदुत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न, पण दंगलीचा उल्लेख नाही

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यातील महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा रविवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झाली. चार दिवसांपूर्वी किराडपुऱ्यातील राम मंदिरासमोर झालेल्या दंगलीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे सरकारवर तोफ डागतील अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, त्यांनी ४० ते ४५ मिनिटांच्या भाषणात दंगलीचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे ठाकरे यांनी हिंदुत्वाची सावध भूमिका मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

रविवारी झालेल्या सभेत शिवसैनिकांबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसोबत भारतमाता आणि संविधानाच्या प्रतीला पुष्प अर्पण करण्यात आले. चार दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीनंतर उद्धव सेनेचे स्थानिक नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आणि एआयएमवर तोफ डागली होती. खैरे यांनी तर फडणवीस हेच या दंगलीचे सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून ठाकरे हा धागा पुढे नेतील अशी चर्चा होती. मात्र, ‘जातीय आणि धार्मिक तेढ वाढवायचे प्रयत्न सुरू झाले की निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत असे समजावे’ असा ओझरता उल्लेख ठाकरे यांनी केला.

सर्वच नेत्यांच्या भाषणात चर्चा सावरकरांचीच भाजपने शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले अाहे. या यात्रेचा सभेतील प्रत्येक वक्त्याने त्यांच्या भाषणात उल्लेख केला. सावरकर महापुरुष होते हे आम्हाला मान्यच आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेला कोणाचाही विरोध केला नाही. अजित पवार यांनी तर थेट सरकारमध्ये हिंमत असेल तर सावरकर यांना भारतरत्न द्या, असे आवाहन केले.

किती मुस्लिम बांधव आले? उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे ‘जमलेल्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी भाषणाची सुरुवात करत हजारो जनसमुदायाच्या टाळ्या घेतल्या. हिंदुत्वावर बोलताना त्यांनी लष्करातील औरंगजेब नावाच्या गनमॅनचे उदाहरण दिले. त्यांनी देशासाठी प्राण दिले. त्याचबरोबर क्रांतिकारी अश्फाकउल्ला खानचेदेखील उदाहरण दिले. सभेत किती मुस्लिम बांधव आलेॽ याची विचारणा केली. त्यामुळे प्रखर हिंदुत्वाकडून ठाकरे यांच्या सर्वसमावेशक भूमिकेची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती.

कोरोनाकाळातील निर्णय चांगले वाटल्यानेच आलो सभेत शीख - मुस्लिम कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. कोरोनाकाळात महाविकास आघाडीच्या सरकारने जात, पात, धर्म पाहिला नाही. सर्व जनतेला कोरोनाकाळात महाविकास आघाडीने आधार दिला. या सरकारचे अनेक िनर्णय आम्हाला चांगले वाटले. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी आलो असे ते सांगत होते.