आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून तरुणीला जाळण्याचा प्रयत्न:तरुणाने स्वतःला पेटवून घेत संशोधक विद्यार्थिनीला प्रयोगशाळेत मारली मिठी; दोघांची प्रकृती गंभीर

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील शासकीय विज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या एका विद्यार्थिनीवर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते. मात्र, तो कोणत्या गावचा रहिवासी आहे, हे अजून कळालेले नाही.

कशी घडली घटना?

महाविद्यालयात आज दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यावेळी मुलगी प्राध्यापक कक्षात एकटीच असल्याची संधी साधून गजानन आत घुसला. आत येताच त्याने आतून कडी लावून घेतली. काही कळण्याच्या आतच त्याने स्वतःच्या व मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेत मुलीला मिठी मारली. या घटनेत दोघेही भाजले. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले असून, मुलगा साधारण 70 तर मुलगी 30 टक्के भाजल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडे केली होती तक्रार

विद्यार्थिनी आणि गजानन गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद झाले होते. त्याबाबत मुलीने पोलिस ठाण्यात दोन - तीन वेळा लेखी तक्रारही दिली होती. मात्र, साधारण अदखलपात्र नोंद करत पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नसल्याची खंत या मुलीच्या मैत्रिणींनी व्यक्त केली.

जबाब नोंदवणे सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचा जबाब नोंदवणे सुरू असून, तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही विद्यार्थी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन करत असल्याचे समजते. संबंधित मुलगी ही बायोफिजिक्स अभ्यासक्रमाची विज्ञान संस्थेतील माजी विद्यार्थिनी आहे.

तपास सुरू

विद्यार्थिनीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे विद्यापीठ आणि शासकीय विज्ञान संस्थेत खळबळ उडाली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये ही भीतीचे वातावरण आहे. संबंधित विद्यार्थ्यांनीवर प्रेमप्रकरणातून हल्ला केला की तर इतर काही कारण आहे, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.

एप्रिलमध्येही तरुणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार या वर्षी 20 मे रोजी औरंगाबादमधील देवगिरी महाविद्यालयाच्या परिसरात घडला होता. दुपारच्या सुमारास ही घटना होती. ग्रंथी सुखप्रीत कौर असे मृत तरुणीचे नाव होते. ती 'बीबीए'च्या प्रथम वर्षात शिकत होती. तेव्हा हल्लेखोराने तिला जवळपास 200 फूट ओढत नेऊन तिची चाकूने गळा चिरून हत्या केली होती. तशाच घटनेची पुनरावृत्ती इथे होताना दिसतेय.

हिंगणघाटची आठवण ताजी

वर्ध्यातील हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारी 2020 रोजी एका 25 वर्षीय प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेत ही प्राध्यापिका गंभीररित्या भाजली. तिला नागपूरमधील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर या मुलीने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, 10 फेब्रुवारी 2020 रोजी या तरुणीचा मृत्यू झाला.

थरकाप उडवणाऱ्या घटना

- उल्हासनगरमध्ये 30 मार्च 1990 रोजी रिंकू पाटीलला दहावीची परीक्षा सुरू असतानाच चौघांनी जिवंत जाळले. आरोपी हातात शस्त्र, पिस्तूल, पेट्रोल कॅन घेऊन शाळेत घुसले होते. त्यांनी वर्गात शिरून सोळा वर्षांच्या रिंकू पाटीलला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळले. रिंकूने लग्नास नकार दिल्याने आरोपीने हे कृत्य केले होते. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली होती.

- मुंबईत 23 जून 2000 रोजी विद्या प्रभुदेसाई या तरुणीलाही लग्नास नकार दिल्याने भर रस्त्यात जिवंत जाळले होते. विद्या बँकेत नोकरी करायच्या. त्याच बसची वाट पाहत होत्या. तितक्यात आरोपी रसिकने पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळले. पुढे न्यायालयाने त्याला जन्मठेप ठोठावली.

- नागपूरमध्ये श्रीमती राजश्री मुळक महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मोनिका किरणापुरे हिचा 11 मार्च 2011 रोजी चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. एका शिक्षकाने एकतर्फी प्रेमातून प्रेयसी विद्यार्थिनीला संपवण्याची सुपारी दिली होती. त्यांनी शिक्षकाची प्रेयसी समजून मोनिकाचा बळी घेतला. यात हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

- ठाण्यात ऑगस्ट 2018मध्ये प्राची झाडे या बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली. प्राची सकाळी ऑफिसला निघाली. तेव्हा आकाश पवारने तिच्यावर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला.

- सांगलीत 2 सप्टेंबर 1998 रोजी एकतर्फी प्रेमातून अमृता देशपांडे या तरुणीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. बबन राजपूत हा अमृतावर एकतर्फी प्रेम करायचा. तो लग्नासाठी धमकी द्यायचा. मात्र, अमृताने त्याला भीक घातली नाही. ती क्लाससाठी सायकलीवरून निघाली असता राजपूतने तिच्या चाकूने वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला. पुढे न्यायालयाने राजपूतला जन्मठेप सुनावली. त्यानंतर शिक्षा भोगून तो बाहेर पडला.

बातम्या आणखी आहेत...