आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ:पैसे घेऊन उत्तरपत्रिका लिहिण्यास देणाऱ्या शेंद्र्यातील दळवी काॅलेजची आज चौकशी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शेंद्रा येथील वाल्मीकराज दळवी कॉलेजमधील परीक्षा केंद्राच्या चौकशीसाठी वरिष्ठ प्राध्यापकांची तीनसदस्यीय समिती स्थापन केली आहे. ‘दिव्य मराठी’च्या दणक्यांमुळे समितीला २४ तासांतच अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. परीक्षा केंद्र ताब्यात घेऊन विद्यापीठाच्या बैठ्या पथकाद्वारे परीक्षा घेतली जाईल. अहवाल आल्यानंतर संलग्नता रद्द करणे, फेरपरीक्षेचा पर्याय आणि प्रसंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शेंद्रा परिसरातीलच ‘पीपल्स कॉलेज ऑफ फॉरेन्सिक सायन्स अँड सायबर सिक्युरिटी’मधील बीएस्सीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा शेजारच्या कॉलेजमध्ये २३ मार्चपासून सुरू आहे. अगदी छोट्या इमारतीत वाल्मीकराज दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठाने परीक्षा केंद्र दिले आहे. या केंद्रात सुरू असलेल्या गैरप्रकारांचा ‘दिव्य मराठी’ने भंडाफोड केला आहे. ‘पाचशे रुपयांत पेपर सेटिंग’ या मथळ्याचे वृत्त झळकताच राज्यभरात खळबळ उडाली. कुलगुरूंनी या केंद्रावर तातडीने कारवाईसाठी कठोर पावले उचलली आहेत. विद्यापीठाने हे परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचे निश्चित केले आहे. आता उर्वरित पेपर विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या देखरेखीत घेतले जातील. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. भारती गवळी

यांनी तातडीने तीन परिपत्रके जारी केली आहेत. दरम्यान, याप्रकरणी व्हायरल झालेल्या अॅडिओ क्लिपशी आमचा कुठलाही संबंध नाही. संबंधित मुलीने परीक्षा हॉलमध्ये सोबत आणलेला मोबाइल पर्यवेक्षकांनी काढून घेतल्यामुळे मुलीचे आणि पर्यवेक्षकांचे वाद झाले होते, असा खुलासा महाविद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. दळवी यांनी लेखी निवेदनाद्वारे केला आहे.

प्राचार्यांना देणार कारणे दाखवा नोटीस संवेदनशील परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांऐवजी बैठी पथके दिली जातील. सहकेंद्रप्रमुखांचे काम ‘मॉनिटर’ केले जाईल. भरारी पथकांत नियुक्त केलेल्या प्राध्यापकांना संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यमुक्त करणे गरजेचे आहे. प्राध्यापकांना न सोडणाऱ्या प्राचार्यांना नोटीस दिली जाईल. दळवी कॉलेज दोषी आढळले तर त्यांची संलग्नता रद्द करून त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यासही सांगण्यात येईल, असे कुलगुरू डाॅ. येवले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

रफिक झकेरिया महाविद्यालयातही बैठे पथक ‘बाहेरचे लोक परीक्षा केंद्रात येऊन आम्हाला धमकावत आहेत. त्यांच्यावर प्रतिबंध घाला,’ अशी तक्रार डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमेन केंद्राच्या प्रमुख डॉ. विद्या प्रधान यांनी विद्यापीठाकडे केली त्यांच्या तक्रारीमुळे कुलगुरूंनी तेथेही विद्यापीठाचे बैठे पथक नियुक्त केले आहे.