आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करात्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शेंदुरवादा येथे संगीत दीपोत्सवासह नृत्य, गायन, वादन कार्यक्रमाची मैफल रंगली. यात महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांच्या शिष्यांनी कथ्थक नृत्यांची प्रस्तुती केली. नांदेडचे पंकज सिरभाते यांनी व्हायोलियन वादन, प्रसिद्ध गायक कृष्णराज लव्हेकर यांनी शास्त्रीय गायनात विविध रागांचे सादरीकरण केले.
गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा येथे मंगळवारी श्री मध्वमुनीश्वर महाराज संस्थानतर्फे सिंधुरवदन गणेश मंदिर या ठिकाणी दिव्यांचा दीपोत्सव झाला. या वेळी महिलांनी गणपती मंदिराच्या परिसरात असलेल्या बारवमध्ये दिवे लावले, उपस्थितांनी नदीच्या पात्रात द्रोणमध्ये दिवे सोडले. आकाशा ढुमने, मेधा पाध्ये, श्रीकांत उमरीकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
तबला-व्हायोलिन वादनात रसिकांनी धरला ठेका : कार्यक्रमाची सुरुवात नांदेडचे पंकज सिरभाते यांच्या व्हायोलियन वादनाने झाली. त्यांनी राग जय जयवंतीचे सादरीकरण केले. सिंधुरवदन गणेश मंदिराची ऐतिहासिक वास्तूत मंद प्रकाश, चंद्राचा प्रकाश अन् तबला, व्हायोलियनचे वादन अशी जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळाली. यानंतर त्यांनी पायोजी मैने राम रतन धन पायो.. भजन सादर केले. त्यांना तबल्यावर प्रशांत गाजरे यांनी साथसंगत केली.
विविध नृत्यांची प्रस्तुती : महागामीच्या संचालिका पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्या शीतल भाबरे, राधा जहागीरदार, सिध्दी सोनटक्के यांनी कथ्थक नृत्याची प्रस्तुती केली. सुरुवातीला ताल वसंत, गणेश वंदनाने नृत्याचे सादरीकरण केले. कृष्ण नामावली नृत्यातून १०८ नावाच्या वर्णन नृत्यातून दाखवण्यात आले. कथ्थक नृत्याचे ठुमरी, तिहाई, गत याचे सादरीकरण झाले. ‘तेरो कुंवर कान्हा’ या बोलावर ठुमरीची प्रस्तुती केली. संत ज्ञानेश्वरांच्या तिसऱ्या अध्यायाच्या ओवीच्या माध्यमातून योग तराणा नृत्याचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.
राग गायनातून रसिक मंत्रमुग्ध कृष्णराज लव्हेकर यांनी राग श्याम कल्याण रागातून बडा ख्याल जीओ मेरे लाल....तर छोटा ख्याल सजनी श्याम घर आयेरी..सादर केले. मालकंस राग, झपतालमध्ये लागी लगन मोहे..या गाण्याला रसिकांनी दाद दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत गाजरे, हार्मोनियमवर शांतिभूषण चारठाणकर, तनपुरावर सारंग जोशी, मित गोविंदवार यांनी साथसंगत केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.