आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र पैठण हे गाव संत एकनाथ महाराज यांची जन्मभूमी, कर्मभूमी आणि समाधिस्थान आहे. नाथांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी (देवाची) येथील समाधिस्थान शोधून त्याचा जीर्णोद्धार केला. जी ज्ञानेश्वरी आपण वाचतो ती एकनाथ महाराजांनी शुद्ध केलेली असल्याने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आहेत. आषाढी एकादशीनंतरची दुसरी मोठी वारी म्हणजे पैठण येथील नाथषष्ठीची वारी. त्या वेळी ७ ते ८ लाख भाविक पैठणमध्ये येतात. जवळपास ७०० दिंड्या ‘भानुदास एकनाथ’चा गजर करत येतात.
पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांची दोन मंदिरे आहेत. गावात नाथांचा वाडा आहे. त्याला नाथ मंदिरही म्हणतात. येथेच साक्षात पांडुरंग श्रीखंड्याच्या रूपात पाण्याच्या कावडी आणत असे तसेच दत्तात्रेय चोपदार होते अशी आख्यायिका आहे. दुसरे मंदिर गोदावरी नदीच्या किनारी आहे. हे मंदिर म्हणजेच संत एकनाथ महाराजांचे समाधिस्थान. या मंदिराची पुनर्बांधणी नाथांचे ११ वे वंशज संस्थानाधिपती श्री भानुदास महाराज गोसावी यांनी केली आहे. या मंदिरास प्रशस्त परिसर लाभला आहे. नाथांचे वंशज सध्या पैठणमध्ये राहतात. पैठण हे तालुक्याचे ठिकाण असून नाथांचे पैठण म्हणूनच ओळखले जाते. येथे अनेक मठ, धर्मशाळा, भक्त निवास असल्यामुळे भाविकांची राहण्याची चांगली सोय आहे.
कसे जाल? : पैठण औरंगाबादपासून ५० किलोमीटरवर आहे. औरंगाबादपर्यंत रस्ता, रेल्वे व विमानाची सोय आहे. तसेच शहागड, शेवगाव व पाचोड या गावांपासूनही पैठणला येण्यासाठी रस्ते आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.