आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालबावटा शेतमजूर युनियन:शाहू महाराज जयंती दिनी गायरान हक्क अन् सामाजिक न्याय परिषदेचे उद्या आयोजन

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने शाहु महाराज जयंती दिनी अर्थात रविवारी (26 जुन) सकाळी 11 वाजता गायरान‌ हक्क व सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. वाळुज येथील कामगार कल्याण केंद्रात होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन शेतकरी-शेतमजूर पंचायत व स्वराज इंडियाचे नेते साथी सुभाष लोमटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्ता ॲड. वैशाली डोळस यांचे प्रमुख भाषण होणार आहे. युनियनचे अध्यक्ष प्रा. राम बाहेती अध्यक्षस्थानी राहतील. रमाई फाउंडेशनचे भारत शिरसाट, लाल बावटा शेतमजूर युनियनचे राज्य सहसचिव गणेश कसबे, कैलाश कांबळे, माजी नगरसेवक अशपाक सलामी, अभय टाकसाळ, मधुकर खिल्लारे, रतन आंबिलवादे, इब्राहिम पटेल, विठ्ठल त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राज्यभर आंदोलने

शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षात आजपर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित करण्याचा क्रांतिकारी निर्णय घ्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने मार्च व एप्रिल महिन्यात ठिकठिकाणी धरणे, निदर्शने करण्यात आली होती. मे महिन्यात औरंगाबादसह राज्यभर आंदोलने झाली.

गायरानधारक त्रस्त

अमरावती येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशीही मुंबई येथे मंत्रालयात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी 2011- 12 साली यासंदर्भात दिलेल्या निर्णयामुळे अडचणी असल्याचे चर्चेत मंत्रीमहोदयानी सांगितले. काही न्यायालयानी तर 35 वर्षापासुनची अतिक्रमणे रद्द करण्याचा निकाल दिला आहे. गायरानधारक यामुळे त्रस्त आहेत व त्यांच्यावर हा अन्याय आहे व शासनाने यातून मार्ग काढला पाहिजे, असे लाल बावटा शेतमजूर युनियनचे प्रा. राम बाहेती यांचे मत आहे. आंदोलनानंतर आता शाहू महाराज जन्मदिनी म्हणजे रविवार 26 जुनला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हावार गायरान हक्क व सामाजिक न्याय परिषदा घेण्याचा लालबावटा शेतमजूर युनियनने निर्णय घेतला आहे. तसेच त्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती दिनी बीड येथेही भव्य राज्यव्यापी गायरान हक्क व सामाजिक न्याय परिषद होईल.

जन्मशताब्दी वर्षात बदल

1978 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय 44 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने प्रथमच घेतला होता. सततच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे पूर्वी घालून दिलेली मर्यादा शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्षात बदलली व 1978 ऐवजी 14 एप्रिल 1990 पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा शासनाने दुसऱ्यांदा निर्णय घेतला. आता ही तारीख पुन्हा बदलण्यात येणे आवश्यक आहे. तसेच भूमिहीनांना सरकारची जमीन ज्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहीन स्वाभिमान योजनेअंतर्गत दिली जाते त्या योजनेंतर्गत गायरान जमिनीवरील सर्व अतिक्रमणे नियमित करता येऊ शकतात हा पर्याय देखील शेतमजूर युनियनच्या वतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सुचवण्यात आला आहे.