आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संशोधन व नवोन्मेष कक्ष अर्थात रिसर्च अँड डेवलपमेंट सेलच्या नवीन संशोधन प्रकल्पांसाठी 33 प्राध्यापकांना 42 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. एनआयआरएफ रँकिंग वधारण्यासाठी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी स्वतःच नववर्षांसाठी ही घोषणा केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे विद्यापीठाने 'रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट सेल’ची स्थापन केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर यांना या कक्षाचे संचालक करण्यात आले आहे. संशोधनात मागे पाडल्यामुळे मागच्या वर्षी एनआयआरएफ म्हणजेच नॅशनल इन्स्टिटयूट रँकिंग फ्रेमवर्कने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विद्यापीठ पिछाडीवर पडले होते. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यांनी संशोधन सुरू असले पाहिजे म्हणून हे अनुदान विद्यापीठ स्थानिक निधीतून देण्याचे जाहीर केले आहे.
’संशोधन व नवोन्मेष’ समाजपयोगी असावे या हेतूने संशोधन प्रकल्पांसाठी दोन महिन्यापूर्वी विद्यापीठ परिसरातील प्राध्यापकांचे प्रस्ताव मागवले होते. एकूण 55 प्रस्ताव आले होते. त्यांचे प्रेसेंटेशन घेण्यात आले होते. त्यापैकी 33 प्रकल्प अंतिमतः मंजूर करण्यात आले आहेत. संबंधित संशोधक प्राध्यापकांना प्रकल्प मंजूरीचे पत्रही तातडीने देण्यात आले आहे. दुसऱ्या वर्षासाठी आणखी प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहितीही कुलगुरु डॉ. येवले यांनी दिली. मंजूर 33 प्रकल्पनांना गरजेनुसार एकत्रित 42 लाख 25 हजारांचा निधी देण्यात येणार आहे. प्रेझेंटेशन झाल्यानंतर 22 प्रकल्प कुलगुरू डॉ. येवले यांनी फेटाळले आहेत.
विज्ञानचे सर्वाधिक प्रकल्प मंजूर
मंजूर झालेल्या संशोधन प्रकल्पांमध्ये सर्वाधिक अठरा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रास्ताव आहेत. त्यांना 28 लाख 10 हजार रुपयांचे अनुदान दिले जाईल. त्यानंतर वाणिज्य व व्यावस्थापन विद्याशाखेचे 6 प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यांना 5 लाख 10 हजार रूपये दिले जातील. मानव्य व सामाजिक शास्त्रे शाखेला 9 लाख 5 हजार अनुदान दिले जाईल. या शाखेतील 9 प्राध्यापकांचे प्रकल्प मंजूर झाले आहेत.
लवकरच 'पेट' परीक्षा घेऊ
नवीन वर्षात जास्तीत जास्त महाविद्यालयांना स्वायत्ता देण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी - सुविधा वाढविण्याचा संकल्प डॉ. येवले यांनी केला आहे. ते म्हणाले, 'नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'स्किल बेस्ड एज्युकेशन’ व 'स्टूडंट सेंट्रिक अॅडमिनिस्ट्रेशन’ हा नव्या वर्षाचा आमचा संकल्प आहे. अटल इन्क्यूबूशन सेंटरच्या माध्यमातून नवउद्योजकांना सहकार्य, पीएच.डी प्रवेश प्रक्रिया (पेट) राबविणे, शहीद स्मारक, सिंथेटीक ट्रॅकची उभारणी लवकरच केले जाणार आहे. असेही कुलगुरु डॉ. येवले यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.