आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर!:वीजग्राहकांना बक्षिसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी; वेळेवर बिल भरणाऱ्यांनाच घेता येणार लाभ

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी बक्षिस योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत मराठवाड्यातील 101 उपविभागातून हजार रुपया पर्यंतची प्रत्येकी 2 बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकासाठी असेल.

यासोबतच दरमहा 22 विभागांतून प्रत्येकी एक मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, 9 मंडलातून प्रत्येकी एक मोबाइल हँडसेट किंवा टॅब्लेट, 3 परिमंडलातून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस आहे. प्रादेशिक कार्यालय स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे बंपर बक्षीस ठेवले आहे.

ऑगस्ट महिन्यात मुदतीत वीजबिल भरणाऱ्या मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांना महावितरणच्या योजनेत भरघोस बक्षिसे जिंकण्याची आणखी एक सुवर्णसंधी मिळाली आहे. जून महिन्याच्या पहिल्या सोडतीत 238 भाग्यवान ग्राहकांनी बक्षिसे जिंकली आहेत. महावितरणच्या या आगळ्यावेगळ्या योजनेमुळे ग्राहकांचा वीजबिल भरण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

घरगुती ग्राहकांना दर महिन्याला वेळेवर वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोदावले यांच्या संकल्पनेतून ही अभिनव बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल नियमित भरावे यासाठी महावितरण त्यांना वारंवार आवाहन करते परंतु सर्वच ग्राहक वेळेवर आपली बिले भरत नसल्याने थकबाकी वाढत आहे. त्यामुळे महावितरणला वीजखरेदीसह इतर खर्चाचा ताळमेळ बसवणे जिकिरीचे झाले आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाईही महावितरणला करावी लागते. तसेच बिल वेळेवर न भरणाऱ्या ग्राहकांना पुढील बिलात व्याज तसेच विलंब शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टळावा, घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास स्वतः पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

दरमहा बिल भरण्याचे अनेक फायदे आहेत. बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट तसेच ऑनलाइन बिल भरल्यास 0.25 टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येते. या सवलतींबरोबरच योजनेत भेटवस्तू स्वरूपात विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे. थकबाकीसह दरमहा संपूर्ण वीजबिल भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत बिले भरावी लागतील. योजनेत जून महिन्याची सोडत नुकतीच काढण्यात आली. त्यात 238 ग्राहक भाग्यवान विजेते ठरले. जुलैची सोडत 10 ऑगस्टला तर ऑगस्टची सोडत 10 सप्टेंबरला काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...