आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहाबाजार येथील दर्गा तकिया रोशन अली शाह कादरी निशाने मुबारक हजरत मेहबूब सुभानी यांच्या मुतव्वली पदासाठी दावे करत दोघांनी वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर केले होते. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने याबाबत निकाल देत दोन्ही अर्जदारांचे अर्ज बाद केल्याची माहिती समोर आली आहे.
शहरात प्रसिद्ध असलेल्या दर्गा तकिया रोशन अली शाह कादरी ‘निशाने ए मुबारक’ शहाबाजार येथून दरवर्षी निशान ए जुलूस काढण्याची परंपरा आहे. या दर्ग्याच्या मुतव्वली पदासाठी शेख नासेर शेख कादर (रा. शहाबाजार) आणि इर्शाद अहेमद नसीम अहेमद (रा. शहाबाजार) यांनी वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर केले होते. इर्शाद अहेमद यांचे वडील नसीम अहेमद हे १९९६ ते २०२० या कालावधीत कार्यवाहक किंवा कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने मुतव्वली पदासाठी अर्ज केला.
शेख नासेर शेख कादर हे दुसरे दावेदार आहेत. त्यांचे काका हे मूळ कमिटीमध्ये सहायक होते. काका शेख चांद शेख छब्बू यांच्या नावाने काढलेल्या पोलिस परवानगीची कागदपत्रे जमा केली. शेख चांद यांच्यानंतर शेख कादर हे सहायक म्हणून काम करीत होते. शेख कादर यांचा मुलगा शेख नासेर यांनी मुतव्वली पदासाठी दावा केला होता.या प्रकरणात दोन्ही बाजूंची माहिती वक्फ मंडळात सादर केली. दोन्ही दाव्यांमध्ये या दर्ग्याच्या १९५६ च्या नोंदीत मुतव्वली म्हणून सय्यद हसन सय्यद जलालोद्दीन हे दाखवले आहेत. दोघांचाही मूळ मुतव्वलींशी संबंध नाही. यामुळे दोन्ही अर्ज बाद करण्याचा निर्णय वक्फ बार्डाने १७ जानेवारी २०२३ रोजी दिला. आता दर्ग्याचे सर्व अधिकार हे वक्फ बोर्डाकडे गेल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.
आदेशानंतरही दुसऱ्या पक्षाच्या ताब्यात दर्गा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सविस्तर आदेश दिलेले नाहीत. दावा रद्द झालेल्या अर्जदारांकडे आजही दर्ग्याचे नियोजन असल्याचा आरोप शेख नासेर शेख कादर यांनी केला आहे. वक्फ बोर्डाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून कार्यभार स्वत:कडे घ्यावा, अशीही मागणी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.