आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत पाणीप्रश्न गंभीर:शहरातील प्रत्येक जलकुंभावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती, शहराच्या पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय खासगी दौर्‍यानिमित्त सुटीवर गेले आहे. शहराचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील प्रत्येक जलकुंभावर एका वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. हे 31 अधिकारी आता पालिकेच्या अधिकार्‍यासोबत नव्हे तर लाइनमन व जलकुंभावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांशी चर्चा करुन तोडगा काढणार आहे.

विशेष म्हणजे, या कामासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व महापालिकेच्या काही अधिकार्‍यांची नियुक्ती केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहराचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी हातात दांडके घेऊन काम करा, असे आदेशच विभागीय आयुक्तांना दिले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहरात घेतलेल्या जाहीर सभेत सांगितले होते. त्यानुसार आता केंद्रेकरांनी वारंवार बैठका घेऊन नागरिकांना पाणीटंचाईतून दिलासा देण्यासाठी कमान हाती घेतली आहे. मंगळवारी पुन्हा त्यांनी पालिका अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यात सूक्ष्म नियोजन करण्याचे आदेश दिले. जलकुंभावरून पाणी सोडणारे कर्मचारी व गल्लोगल्ली पाणी देणारे लाइनमन यांना पाणीपुरवठ्याचे बारकावे माहिती आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून नागरिकांना तीन दिवसांआड किंवा चार दिवसांआड पाणी देण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत नियुक्त अधिकारी प्रत्येक जलकुंभावर जाऊन चर्चा करणार आहे. यासंबंधीच्या सूचनाच केंद्रेकर यांनी अधिकार्‍यांना दिल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

हर्सूल तलावातून समांतर जलवाहिनी

शहागंज, रोजाबागसह जुन्या शहरातील सुमारे 16 वॉर्डांना हर्सूल तलावातून साडेचार एमएलडी पाणीपुरवठा होत असे. मात्र, आता पाणी दहा एमएलडीपर्यंत वाढवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजयसिंग यांच्या सल्ल्यानुसार हर्सूल तलावातून जटवाडा रोडने जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत स्वतंत्र वाहिनी टाकली आहे. मात्र, या वाहिनीला जलशुद्धीकरण केंद्राजवळ व हर्सूल तलावाजवळ क्रॉस कनेक्शन दिले आहेत. त्यामुळे सुमारे पाच एमएलडी पाणी वाढेल. मात्र केंद्रेकर यांनी क्रॉस कनेक्शन न करता थेट समांतर वाहिनी टाकण्याची सूचना केली आहे. त्यामुळे हर्सूल तलावातून सुमारे 15 एमएलडी पाणी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...