आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:चिकलठाणा पिटलाइनला मंजुरी, तरीही दानवे जालन्यासाठी आग्रही, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या उत्तरानंतर 7 दिवसांत राज्यमंत्र्यांच्या घोषणेने आश्चर्य

औरंगाबाद / सतीश वैराळकरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात रेल्वेची पिटलाइन औरंगाबादेत उभारायची की जालन्यात यावरून सध्या वादंग सुरू आहेत. औरंगाबादेतील चिकलठाणा रेल्वेस्थानकावर तिची उभारणी करण्यासाठी यापूर्वी दाेनदा प्रस्ताव गेले असून २६ डिसेंबर २०२१ राेजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याला मंजुरी दिली असल्याचे लेखी पत्राद्वारे राष्ट्रवादीच्या खासदार फाैजिया खान यांना कळवलेले आहे. या पत्राच्या सात दिवसांनीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या निर्णयाला डावलून जालन्यात पिटलाइन उभारण्याची घाेषणा २ जानेवारी २०२२ राेजी केल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.

मराठवाड्याचे प्रमुख स्थानक व उद्याेगनगरी असलेल्या औरंगाबादेत पिटलाइन उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून हाेत आहे. भाजपचेच नेते व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील, खासदार फाैजिया खान यांनी वेळाेवेळी त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे. तसेच यापूर्वी दाेन वेळा रेल्वे बाेर्डाकडे त्याबाबतचे अधिकृत प्रस्तावही गेलेले आहेत. असे असताना केवळ आपल्या मतदारसंघात पिटलाइन नेण्याचे श्रेय घेण्यासाठी दानवेंनी २ जानेवारी राेजी त्याबाबत घाेषणा करून जागेचा प्रश्न मिटल्याचेही जाहीर केले. त्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. विशेष म्हणजे ज्या चिकलठाणा स्थानकावर ही मागणी हाेत आहे ताे भागही दानवेंच्या जालना लाेकसभा मतदारसंघातच समाविष्ट आहे.

केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यासह भाजपच्या औरंगाबादेतील नेत्यांकडूनही औरंगाबादेत पिटलाइन उभारण्यासाठी आग्रही मागणी हाेत आहे. ‘दिव्य मराठी’नेही रेल्वे अभ्यासक व लाेकप्रतिनिधींची मते जाणून घेऊन औरंगाबादेतच हा प्रकल्प उभारणे कसे साेयीचे आहे याकडे लक्ष वेधले हाेते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्या फाैजिया खान यांनी ५ एप्रिल २०२१ राेजी मराठवाड्यात लातूर व औरंगाबाद येथे पिटलाइन उभारण्याची मागणी एका पत्राद्वारे केली हाेती. त्यांच्या मागणीला लेखी पत्राद्वारे उत्तर देताना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी चिकलठाण्यात मंजुरी दिल्याचेही सांगितले हाेते. दरम्यान, याबाबत रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

फाैजिया खान म्हणतात...
खा. फाैजिया खान म्हणाल्या, ‘रेल्वेच्या बैठकीत औरंगाबादेत व लातुरात पिटलाइन उभारणीसंबंधीचे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना दिले होते. लातूरची मागणी अद्याप मान्य झाली नसली तरी रेल्वेमंत्री वैष्णव यांनी औरंगाबादची आपली मागणी मान्य करून तसे लेखी पत्र आपणास दिले आहे. आता रेल्वे राज्यमंत्री दानवे काहीही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्यास काही अर्थ नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय हा अंतिम समजला जातो. यात कुठलेच दुमत नसावे.’

काय म्हणतात रेल्वेमंत्री...
खासदार फाैजिया खान यांना पाठवलेल्या पत्रात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, सध्या मराठवाड्यात नांदेड व पूर्णा स्थानकावर काेच दुरुस्ती व स्वच्छतेची साेय आहे. सध्या गाड्यांची संख्या पाहता या दाेन ठिकाणच्या साेयी पुरेशा आहेत. मात्र भविष्यातील गरज लक्षात घेता औरंगाबादपासून १० किलाेमीटरवर असलेल्या चिकलठाणा स्थानकावर पिटलाइन उभारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...