आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:स्टेरॉइड, अँटिबायोटिकचा मनमानी डोस आजार नव्हे, प्रतिकारशक्ती घालवतो

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहव्याधी असणारे, वृद्ध डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेताहेत कोरोनावरील औषधे; डॉक्टरांनी व्यक्त केली दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवण्याची भीती

तिशीतील सोहमच्या अंगात अचानक ताप भरला. जुलाब होऊन अंगातील त्राण गेल्यासारखे वाटू लागले. नाकाला गंध व तोंडाला चव नाही अन् घसा खवखवायला लागला. कोरोनाची लक्षणे असल्याचे जाणवले, पण चाचणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर विलगीकरणात जावे लागेल या भीतीने त्याने रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या आपल्या मित्राला फोन करून अँटिबायोटिक, स्टेरॉइडसारखी औषधे घ्यायला सुरू केली. हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण. पण तरुणांसह सहव्याधी असणारे आणि वयोवृद्धही डॉक्टरांच्या सल्ल्याविना व स्वत:ला कोरोना आहे की नाही याची खात्री न करता काेराेना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सर्रास या औषधांचे सेवन करत आहेत. या प्रकारामुळे इतर जिवाणूशी लढण्याची दीर्घकालीन नैसर्गिक प्रतिकार शक्ती गमावून आपण जिवाणूला बळकट करत असल्याचे मत तज्ञ डॉक्टर व्यक्त करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात येत असलेल्या विषाणू कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले. संसर्ग झपाट्याने वाढत असून या विषाणूचे नवनवीन स्ट्रेन समोर येत आहेत. बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक महिने काही जणांना खोकला, अशक्तपणा असा त्रास होताना दिसतो. व्यक्तिपरत्वे कोरोनाचा परिणाम वेगवेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीला असणारी व्याधी आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती यांचा अभ्यास करून डॉक्टर औषधी घेण्याचा सल्ला देतात. एखाद्याला दीर्घकाळ खोकला असला तर त्याला मर्यादित प्रमाणात स्टेरॉइड देऊन तो वेळीच थांबवण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून होतो. सोबतच रक्तातील वाढलेल्या साखरेला नियंत्रित ठेवण्यासाठी इतर औषधी दिली जाते. तरुणाला दिलेली औषधी सहव्याधी असणारी किंवा वृद्ध व्यक्ती घेत असल्याने आरोग्यविषयक अडचणी वाढून प्रकृती जास्त बिघडल्यानंतर डॉक्टरांकडे येणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्याचे निरीक्षण डॉ. विशाल ढाकरे यांनी नोंदवले.

काय आहेत दुष्परिणाम?

  • स्टेरॉइडमुळे अॅसिडीटी, जठराच्या अल्सरमध्ये होते वाढ.
  • रक्तातील साखर अनियंत्रित प्रमाणात वाढून इतर जंतुसंसर्ग वाढू शकतो. प्रसंगी किडनी किंवा डोळा निकामी होण्याची शक्यता
  • दीर्घकाळ स्टेरॉइड घेतल्याने जास्त भूक लागते व झपाट्याने वजन वाढायला लागते.
  • चुकीच्या पद्धतीने किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविना दीर्घकालीन स्टेरॉइड घेतल्यास हाडाची ठिसूळता वाढून हाडे व सांधे कमकुवत होऊन भविष्यात फ्रॅक्चरला सामोरे जावे लागू शकते,
  • अनावश्यक वेळी अँटिबायोटिक(प्रतिजैविके) औषधे खाल्याने खिशाला भुर्दंड पडतो तो वेगळा
  • परंतु सातत्याने किंवा अनावश्यक वेळी अँटिबायोटिक्स घेतल्याने जिवाणूला प्रतिकार करण्याची नैसर्गिक शक्ती कमी होते व जिवाणू अधिक शक्तिशाली बनतात.
  • काही प्रतिजैविके हृदयाची QTc व हृदयाची गती सोबत बिघाड करून हृदयविकारासाठीसुद्धा कारणीभूत ठरू शकतात.

निष्णात डॉक्टरांनाच ठरवू द्या
स्टेरॉइड किंवा अँटिबायोटिक्स हे आजाराला थोपवण्याचे एक प्रकारचे शस्त्र आहेत. या शस्त्राचा वापर कसा करायचा हे अनुभव सिद्धतेतून निष्णात झालेल्या डॉक्टरांनाच ठरवू द्या. प्रत्येकाचे शरीर कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषध घेऊ नका आणि लक्षणे असल्यास चाचणी करून योग्य उपचार घेतले तरच आपण लवकर बरे होऊ आणि कोरोनालाही हद्दपार करू. - डॉ. विशाल ढाकरे, एम.डी. मेडिसिन.

बातम्या आणखी आहेत...