आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेस्टेशन परिसरातील प्रादेशिक परिवहन विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खासगी दलाल नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत गेले तरच लायसन्स, फिटनेस आदी कामे होतात. यामुळे वाहनचालक-मालक हैराण झाले आहेत. खासगी प्रतिनिधीमार्फत काम करून घ्यायचे तर आरटीओ, अधिकारी व कर्मचारी फुकट पगार घेण्यासाठी ठेवलेत का, असा प्रश्न उपस्थित केला. दलालीला चाप लावण्यासाठी शिवसेनेचे शहर पश्चिम विभागाचे उपशहरप्रमुख संतोष मरमठ यांनी आरटीओमार्फत मुख्यमंत्री, परिवहनमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
वाहन पासिंग, परवाना, यासह विविध कामे करण्यासाठी सरकारने आरटीओ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र केबिन दिलेल्या आहेत. मात्र, त्यांनी नियमबाह्यरीत्या खासगी दलालांची नियुक्ती केली आहे. प्रभारी आरटीओकडे तीन जिल्ह्यांचा कारभार आहे. त्यामुळे त्यांना इच्छा असूनही कामकाजात सुधारणा करणे शक्य होत नाही. परिणामी आरटीओत मनमानी कारभार सुरू आहे. दलालीला वाव दिला जात आहे, असे मरमठ आणि दीपक संभेराव यांनी सांगितले.
अधिकारी उपलब्ध नसतात : रेल्वेस्टेशन येथील जुन्या आणि करोडी येथे नवीन कार्यालयात काही अधिकारी-कर्मचारी केवळ दोन तास थांबतात व निघून जातात. यामुळे वाहने उभे करून ठेवावी लागतात. वारंवार खेटे मारावे लागतात, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
३० किमीचा फेरा रेल्वेस्टेशन येथील आरटीओ कार्यालयात वाहन चाचणीसाठी चांगला ट्रॅक होता. त्यावरील चाचणी बंद केली आहे. त्यामुळे आता ३० किमी दूर करोडीला जावे लागते. काही त्रुटी, अडचण निर्माण झाली तर पुन्हा शहरात यावे लागते. यात वेळ जातो. कामही होत नाही. यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून कामकाजात सुधारणा करा, असे मरमठ म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.