आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:फाेटाे व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करणाऱ्यास अटक; इन्स्टाग्रामवर मैत्री करून जवळीक वाढवण्यासाठी देत हाेता त्रास

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दामिनी पथकाची कारवाई, त्रास देणार नसल्याची हमी दिल्यानंतर साेडले

इन्स्टाग्रामवर एका तरुणाशी मैत्री करणे युवतीला महागात पडले. या तरुणाने मैत्री वाढवून सदर तरुणीकडून छायाचित्रे मागवून घेतली. नंतर ती एडिट करून व्हायलर करण्याची धमकी देत या युवतीला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. एकांतात भेटण्यासाठी तिचा छळ सुरू केला. हा प्रकार तरुणीने पाेलिसांच्या दामिनी पथकाला सांगितला. या पथकाने मंगळवारी सापळा रचून सदर तरुणाला पकडले. तरुणीने नंतर त्याच्याविरोधात तक्रार करण्यास नकार दिल्याने अखेर पथकाने ‘पोलिसी पाहुणचार’ करून त्याला साेडून दिले.

महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय मुलीची तरुणासोबत छावणी परिसरातील एका मेडिकलवर ओळख झाली होती. हा तरुण मेडिकलवर काम करत हाेता. त्यानंतर त्यांची इन्स्टाग्रामवर मैत्री वाढली. रोजच आॅनलाइन संवादही सुरू झाला. या दरम्यान तरुणीने काही छायाचित्र तरुणाला पाठवले होते. परंतु त्याच्या काही दिवसातच तरुणाने या मुलीला प्रेमासाठी आग्रह केला. तिने नकार दिल्यावर ब्लॅकमेलिंग सुरू केले. फाेटाे एडिट करून व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणाच्या या रोजच्या विचित्र मागण्या, त्रासाला कंटाळून तिने बोलणे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे करताच तरुणाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. मंगळवारी त्याने कॉल करून ‘आई-वडील गावाला गेले आहे, तू माझ्या घरी ये’ असा तगादा लावला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तत्काळ दामिनी पथकाला कॉल करून प्रकार सांगितला. पाेलिस उपनिरीक्षक वर्षाराणी आजले यांनी मुलीला बोलावून घेत प्रकार समजून घेतला. त्यानंतर त्यांनी तिला तरुणाला कॉल करून एमजीएमजवळ घ्यायला येण्यास सांगितले. आजले यांच्यासह पथकातील कर्मचारी श्रुती नांदेडकर, प्रिया सरसांडे, कविता धनेधर या साध्या वेशात मुलीसाेबत गेल्या. त्या माझ्या मैत्रिणी असल्याचे तिने तरुणाला सांगितले.

दुचाकीवर आलेल्या तरुणाने त्यांची रिक्षा बीडबायपासकडे घेण्यास सांगितले. रिक्षात या तरुणीसाेबत असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पाठीमागून देखील पोलिस त्याचा पाठलाग करत होते. हे लक्षात येताच सदर तरुणाने दुचाकीमध्येच वळवून पसार होण्याचा प्रयत्न केला.

आजले यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रिक्षातून उतरून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला लिफ्ट मागून तरुणाचा पाठलाग करण्यास सांगितला. दोन दुचाकीस्वारांच्या मदतीने आजले यांनी तरुणास जयभवानीनगर चौकात पकडले.

त्रास देणार नसल्याची हमी दिल्यानंतर साेडले

तरुणीला त्रास देणाऱ्या युवकास आजले यांनी पकडले व नंतर दामिनी पथकाचे वाहन बोलावून ‌त्या‌ला सिडको पोलिस ठाण्यात नेले. त्याचा मोबाइल घेऊन त्यातील तरुणीचे सर्व छायाचित्र डिलिट करण्यात आले. सज्जड दम भरल्यानंतर तरुणाने माफी मागून पुन्हा असा प्रकार करणार नसल्याची ग्वाही दिली. नंतर तरुणाविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. उपायुक्त मीना मकवाना, निरीक्षक किरण पाटील यांनी पथकाला यासाठी मार्गदर्शन केले.