आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवा ध्वजयात्रा:बंजारा समाजातील कलावंतांना मानधन द्यावे, नॉनक्रीमिलेअरची अट रद्द करावी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी व इतर सणांसाठी बंजारा समाजातील कलावंतांना मानधन द्यावे तसेच नॉनक्रीमिलेअरची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी सेवा ध्वज रथयात्रेप्रसंगी सोमवारी (६ फेब्रुवारी) करण्यात आली. क्रांती चौकात तीनशे-चारशे महिला, पुरुष यात्रेत सहभागी होते. बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणानिमित्त सकाळी ९ वाजता राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेच्या वतीने सेवा ध्वज रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. या वेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड, बंजारा समाजाचे कार्यकर्ते गोरखनाथ राठोड, रंजित पवार, अरुण उपस्थित होते.

संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराज यांचा पांढरा ध्वज हाती घेतला. त्यांनी क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सिडको बसस्टँडसमोरील उड्डाणपुलाखाली वसंतराव नाईक चौक येथेही अभिवादन केले. राठोड म्हणाले की, ‘संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा ५९३ कोटी रुपये खर्च करून वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे उभारण्यात येत आहे. यासाठी समाजबांधवांनी उपस्थित राहावे.’ पैठण, बुलढाणा, दिग्रस, कन्नड, वाशिमच्या १०० हून अधिक महिला, पुरुष बंजारा कलावंतांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले. गोपाल चव्हाण, नागोराव चव्हाण, बाळू राठोड यांनी डफ वाजवला.

बंजारा समाजाच्या मागण्या संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, वसंतराव नाईक यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, बंजारा समाजाची नॉन क्रीमिलेअरची अट शिथिल करावी, होळी व इतर कार्यक्रमानिमित्त बंजारा समाजातील कलावंतांना मानधन जाहीर करावे. यवतमाळचे नाव वसंतराव नाईकनगर करावे, अशा मागण्या राष्ट्रीय बंजारा क्रांती सेनेचे गोरखनाथ राठोड यांनी केल्या.

समाजाचा विकास व्हावा औरंगाबाद जिल्ह्यात बंजारा समाजाची अडीच लाख लोकसंख्या आहे. १७५ तांडे आहेत. शहरात ५० हजारांची संख्या आहे. या समाजाचा विकास करणे आवश्यक आहे. - गोरखनाथ राठोड, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय बंजारा क्रांती सेना

बातम्या आणखी आहेत...