आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Arvind Jagtap| Divya Marathi Diwali Magazine 2021 Launched| Arvind Jagtap Dares Do Not Rename City Of Potholes Aurangabad To Sambhaji Nagar Latest News And Updates

आधी विकास, मग नामांतर:औरंगाबादचे नाव बदलण्यापूर्वी विकास करा -अरविंद जगताप; महाराष्ट्र स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती गमावून बसणार नाही याची काळजी घ्या -निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नामांतर करण्यापूर्वी शहर स्वच्छ करा, शहराचा विकास करा -अरविंद जगताप

कोरोनाने हजारो लोक बेघर-बेरोजगार केले. ऑनलाईन शिक्षण फक्त २५ टक्के मुलांनाच मिळाले. पण जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारून भलतेच मुद्दे उकरून काढले जातात. खुळखुळे वाजवले जाते. लोकांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यामागे राजकारण्यांचा स्वार्थ असतो. पण असले खुळखुळे वाजवण्याच्या कामाला तुम्ही हातभार लावू नका. महाराष्ट्र स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती गमावून बसणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी व्यक्त केले.

नेमके काय म्हणाले अरविंद जगताप
औरंगाबाद शहराला खड्ड्यांचे शहर म्हटले जाते. अशी अवस्था केली आम्ही या शहराची आणि आम्हाला शहराचे नाव बदलायचे आहे? या शहराचे नाव संभाजी महाराज यांच्या नावाने जोडण्यापूर्वी आमची, सामान्य नागरिक म्हणून धमकी आहे, की संभाजी महाराजांचे नाव या खड्ड्यांच्या धुळीच्या आणि कचऱ्याच्या शहराला द्यायचे नाही. आधी हे शहर स्वच्छ करा. आधी या शहराचा विकास करायचा आहे आणि मग शोभेल असे नाव द्यायचे आहे.

या शहराला नाव द्यायचे आहे? हे राजकारण आहे तुमचं? लोकांना या फालतू गोष्टींमध्ये अडकवून ठेवायचे आहे. कुठलाही एक पक्ष असे करत नाही. ज्येष्ठ माणसांमुळे मी एक शिकलो की मी कुठल्याही एका पक्षाचे समर्थन करत नाही. एका पक्षाच्या बाजूने बोलायचे नाही असेही अरविंद जगताप यांनी ठणकावले आहे. जगताप यांनी दिलेल्या भाषणावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

अंधाराचे जाळे फिटतंय अन् आकाश मोकळे होतंय - संजय आवटे

प्रास्ताविकात आवटे म्हणाले, की ‘मागील दोन वर्ष कोरोनामुळे आपण बंदिस्त होतो. पण आता यंदाची दिवाळी नवी उमेद घेऊन आली आहे. अंधराचे जाळे फिटू लागले आहे, अन् आकाश मोकळे होत आहे. ‘कोरोना’नंतर देशाचे अर्थकारण, समाजकारण, माणूस बदलणार आहे. घर, कुटुंब संस्था, जग बदलणार आहे. बातमीतूनही हे टिपता येते, पण बातमीच्या पलीकडे विश्लेषण करत त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न दिवाळी अंकात करण्यात आला आहे. आम्ही यंदा दिवाळी अंकाची दशकपूर्ती करत आहोत. लोकांचा आवाज होत लोक वाचक हाच केंद्रबिंदु मानून आम्ही पत्रकारिता करत आहोत.

‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाचे सोमवारी ( १ नोव्हेंबर) एमजीएमच्या आईन्स्टाईन सभागृहात चपळगावकर आणि प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे, महाव्यवस्थापक सुभाष बोंद्रे, औरंगाबाद आवृत्तीचे संपादकीय प्रमुख महेश रामदासी, अकोला आवृत्तीचे तथा दिवाळी अंकाचे संपादक विजय बुवा यांची मंचावर उपस्थिती होती.

चपळगावकर म्हणाले, ‘दिवाळी अंक प्रसिद्ध करण्याच्या परंपरेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. दिवाळी अंक आणि साहित्य संमेलनांचे बाहेरच्या राज्यात अप्रुप वाटते. दिवाळी अंकातील साहित्याचा स्तर आता घसरत चालला आहे. पुन्हा-पुन्हा तेच ते प्रसिद्ध केले जाते. पण नव्या प्रश्नांची मांडणी नव्याने केली पाहिजे. दिवाळी अंकातून आनंद दिला गेला पाहिजे. दिवाळीचे चार दिवस आनंदाने आप्तांसोबत घालवायचे असतात. विजय तेंडुलकरांमध्ये हिंसेलाही वेगळ्या पद्धतीने मांडण्याचे सामर्थ्य होते. चिंतामण जोशी यांनी नणंद-भावजय यांच्यातील संघर्ष साहित्यातून दाखवला. त्यामुळे ते आजही साहित्यातून जिवंत आहेत.’ असेही चपळगावकर म्हणाले.

राज्य संपादक संजय आवटे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांच्या हस्ते सुभाष बोंद्रे, विजय बुवा, गजानन दौड, रोशनी शिंपी, विद्या गावंडे, महंमद इकबाल यांचा सत्कार करण्यात आला. ‘दिव्य मराठी’चे सिटी इन्चार्ज श्रीकांत सराफ यांनी सूत्रसंचालन केले. बुवा यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...