आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊनमुळे कंपनीतील नोकरी गेली. स्वत:ची जमापुंजी, नातेवाईक आणि मित्रांकडून भांडवल उभे केले. रेडिमेड कपड्यांचे दुकान टाकले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दिवाळीत चांगला व्यवसाय होईल ही अपेक्षा होती. मात्र, दुर्दैव असे दिवाळीचा सीझन सुरू असतानाच गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री चोरट्यांनी दुकानात चोरी केली आणि अक्षरश: संपूर्ण दुकान साफ केले.
औरंगाबाद- शिर्डी मार्गावरील आसेगाव फाटा येथील ही घटना आहे. पंकज गुलाबराव थोरात (२५ रा. आंबेगाव) असे दुकान मालकाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात चोरांच्या विरोधात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ कलेक्शन असे पंकजच्या दुकानाचे नाव आहे. तो अाधी वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात नोकरी गेल्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरू केला. पंकजचे वडील शेतकरी आहेत. गुरुवारी दिवसभर व्यवसाय करून पंकज हा नेहमी प्रमाणे दुकान बंद करून रात्री घरी गेला. गुरुवारी धनत्रयोदशीच्या सकाळी पंकज थोरात याने दुकान उघडले आणि तर सर्व रॅक रिकामे दिसून अाले. हा प्रकार पाहून त्याच्या पायाखालची वाळू सरकली. ४ ऑक्टोबर रोजी गुलाबराव थोरात यांनी दुकानाचे उद्घाटन केले. महिनाभरात पंकजही व्यवसाय शिकत होता, त्यातच हा प्रकार घडला. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचा माल चोरून नेला. यात साड्या, रेडिमेड कपडे जीन्स, ड्रेस मटेरियल होते. पोलिस उपनिरीक्षक रवी कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली
पत्रे उचकटून गाडीत भरून नेले कपडे :
पंकजचे दुकान रस्त्याला लागून आहे. पाठीमागे ओसाड जमीन आहे. रस्त्याच्या एका बाजूला कंपाउंड आहे. त्यामुळे रस्त्यावरून दुकानाच्या पाठीमागचे काहीच दिसत नाही. चोरटे दुकानाच्या पाठीमागचे पत्रे उचकटवत आत घुसले आणि त्यांनी चोरी केली. कपड्याची संख्या पाहता हा सर्व माल नेण्यासाठी त्यांनी चारचाकी वाहनाचा उपयोग केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.