आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात व्हेंटिलेटर्स ‘जिवंत’:टीकेची झोड उठताच भाजप नेत्यांचे दिल्लीपर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
  • आरोग्यमंत्री, कंपनीशी संपर्क साधून मुंबईहून त्वरित बाेलावले इंजिनिअर
  • पहिल्या दिवशी सात यंत्रे सुरू, चार दिवसांत इतरही करणार सज्ज

पंतप्रधान (पीएम) केअर फंडातून घाटीला मिळालेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असून ते उपयाेगात येत नाहीत अशी चाेहाेबाजूंनी टीका हाेताच स्थानिक भाजप नेते खडबडून जागे झाले. खासदार डॉ.भागवत कराड यांनी घाटीत जाऊन नेमकी काय परिस्थिती अाहे ते जाणून घेतले. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री, सचिव आणि व्हेंटिलेटरचा पुरवठा करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधत अडचण सांगितली. कंपनीने लगेच बुधवारी इंजिनिअर पाठवून दिवसभरात किरकाेळ काम करून सात व्हेंटिलेटर सुरू केले. त्यापैकी २ चाचणीसाठी लावण्यात आले. पुढील चार दिवसांत अाणखी यंत्रे सुरू केली जातील.

पीएम केअरमधून घाटीला सुरुवातीच्या काळात मिळालेले ५० व्हेंटिलेटर्स हे अायसीयूच्या दर्जाचे नाहीत. तसेच काही स्पेअरपार्ट‌्स‌ नसल्याने ते पडून असल्याचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने एप्रिल महिन्यात दिले हाेते. त्यानंतर यापैकी निम्मे व्हेंटिलेटर्स मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांत पाठवण्यात अाले. दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांनी साेमवारी अाढावा बैठकीत नव्याने अालेले १०० व्हेंटिलेटर्सही निकृष्ट असून त्याचा रुग्णांना उपयाेग हाेत नसल्याचा जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष अाराेप केला हाेता. याच बैठकीत खासदार डाॅ. कराड व अामदार अतुल सावे या भाजप अामदारांनी हे अाराेप फेटाळून लावले. मात्र या विषयावरून केंद्र सरकारची बदनामी हाेत असल्याचे लक्षात येताच डाॅ. कराड यांनी तातडीने व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, आरोग्य खात्याचे सचिव राजेश भूषण आणि जॉइंट सेक्रेटरी डॉ. मनदीपकुमार भंडारी यांच्याशी चर्चा केली. त्यांना औरंगाबादच्या परिस्थितीची माहिती देतानाच व्हेेंटिलेटर लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

असा अाला हालचालींना वेग
घाटीत आलेले व्हेंटिलेटर ज्योती सीएनसी कंपनीचे आहेत. मंगळवारी डॉ. कराड आणि आमदार अतुल सावे यांनी घाटीला भेट देऊन अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांच्याशी बंद यंत्रांबाबत चर्चा केली. तेथून कंपनीचे चेअरमन आणि सीईओ पराक्रम जडेजा, व्यवस्थापकीय संचालक श्यामल राम आणि महाराष्ट्राचे बायोमेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख राजेश रॉय यांना फाेन करून समस्या सांगितली. राजेश रॉय कोलकात्याला असल्याने त्यांनी इंजिनिअर आशुतोष गाडगीळ यांना शहरात पाठवले. बुधवारी सकाळी १०.३० वाजता इंजिनिअर आशुतोष आणि चार जणांची टीम मुंबईहून घाटीत पोहोचली. त्यांना अाठ व्हेंटिलेटर देण्यात आले. पैकी ७ दुरुस्त करून दाेन प्रत्यक्ष रुग्णांवर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.

साेमवारच्या अाढावा बैठकीत खा. इम्तियाज व भाजप नेत्यांमधील वादाचे वृत्त
हे तर मेक इन इंडिया : डॉ. भागवत कराड म्हणाले, पीएम केअर फंडातून आतापर्यंत ११०० व्हेंटिलेटर महाराष्ट्राला अाले अाहेत. पहिल्या लाटेत भारत इलेक्ट्राॅनिक्सची सीव्ही २०० माॅडेलची ४२ यंत्रे मिळाली. ती घाटी आणि सिव्हिलमध्ये सुरू आहेत. नंतर एईओ-एन कंपनीची १० यंत्रे आली. तीही सुरू आहेत. तिसऱ्या टप्प्यात एग्वा कंपनीची ३२ ट्रान्झिट व्हेंटिलेटर्स आली. ती रुग्णवाहिका, रुग्ण हलवण्यासाठी कामी येतात. चौथ्या टप्प्यात १२ एप्रिलला ज्योती सीएनसीचे १०० आणि नंतर ५० व्हेंटिलेटर आले. मेक इन इंडियाअंतर्गत त्यांचे उत्पादन झाले आहे. परदेशी व्हेंटिलेटर ३० ते ५० लाखात येतात. हे १२ लाखांत मिळाले आहेत.

चाचणी करू, मग यंत्रांबाबत बाेलू
कंपनीच्या इंजिनिअरने काही व्हेंटिलेटर चालू केले आहेत. ते काम करतायत की नाही हे थेट रुग्णांवर वापरल्याशिवाय लक्षात येणार नाही. ते चाचणीसाठी दिले आहेत. उद्या निकाल समजेल. चाचणीशिवाय व्हेंटिलेटर खराब आहेत असे बोेलणे घाईचे ठरेल, असे मी आधीपासून सांगत होते. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय

इंजिनिअर आशुतोष गाडगीळ यांना सवाल

व्हेंटिलेटर्सची नेमकी स्थिती काय आहे?
१५० पैकी ५० व्हेंटिलेटर अजून इन्स्टाॅल केलेले नाहीत. ते बॉक्स पॅक आहेत. ५५ वेगवेगळ्या गावांत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राप्रमाणे इन्स्टाॅल केले. काही खासगी रुग्णालयांत आहेत. घाटीत २५-३० असावेत. त्यापैकी त्यांनी आम्हाला १७ दाखवले.

आज दिवसभरात काय काम केले?
आम्हाला ८ बंद व्हेंटिलेटर देण्यात आले होते. आम्ही रेग्युलेटर सेटिंग, टेस्टिंग अशा किरकोळ सेेटिंग करून ७ चालू केले. पैकी २ रुग्णांना लावण्यासाठी नेले आहेत.

हे व्हेंटिलेटर आयसीयू दर्जाचे आहेत का?
होय. १०० टक्के आयसीयू दर्जाचे आहेत. यात मॅक्सिमम डिलिव्हरेबल ऑक्सिजनची क्षमता १०० लिटर प्रतिमिनिट आहे. हे आम्ही घाटीच्या तज्ज्ञांना दाखवले आहे.

व्हेंटिलेटरसोबत अॅक्सेसरीज दिल्या नाहीत?
सर्व अॅक्सेसरीज आहेत. काही बाबी कन्झ्युमेबल असतात. म्हणजे प्रत्येक रुग्णामागे बदलाव्या लागतात. त्या आम्ही देत नाही.

किती दिवसांत होईल हे काम?
सकाळी अधिष्ठातांसोबत बैठक झाली. प्रत्यक्षात दुपारनंतर काम सुरू केले, तरी ७ दुरुस्त झाले. गुरुवारी अजून एक सहकारी येणार आहे. फार तर ३-४ दिवसांत सर्व व्हेंटिलेटर सुरू होतील.

बातम्या आणखी आहेत...