आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:3 लाखांची मर्यादा 10 लाख होताच राज्यात मजूर संस्था पुनरुज्जीवित करण्याची लगबग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील मजूर कामगार सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या कामाची मर्यादा ३ लाख रुपयांहून १० लाख केल्याने संस्थांच्या संचालकांमध्ये उत्साह संचारला आहे. तीन लाखांची कामे परवडत नसल्याने अनेक संस्थांनी याकडे कानाडोळा केला होता. तीनपट मर्यादा वाढवल्याने राज्यातील निष्क्रिय असलेल्या सुमारे ३५०० संस्थाचालकांनी त्या पुनरुज्जीवित करण्यासाठी लगबग सुरू केली आहे.

जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वन खाते, कृषी विभाग आणि जागतिक बँकेच्या प्रकल्पातील एकूण कामाच्या ३३ % कामे मजूर सहकारी संस्थामार्फत करण्याचा नियम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या कार्यकाळात या संस्थांना अ वर्गासाठी १५ लाख तर ब वर्गासाठी ७.५ लाख रूपयापर्यंतची कामे मिळत होती. फडणवीस सरकारने ही मर्यादा ३ लाख रूपयांवर आणल्याची माहिती औरंगाबाद जिल्हा मजुर कामगार सहकारी संस्था संघाचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार अब्दुल नबी यांनी दिली. मविआ सरकारने ही मर्यादा १० लाख रूपये केली आहे.

संस्थांना जीवनदान : अब्दुल गफ्फार म्हणाले, सिमेंट, वीटा, वाळू, स्टील यांच्या वाढलेल्या किंमती बघता तीन लाख रूपयांचे काम परवडत नसल्याने गेल्या ५ वर्षात अनेक संस्थांनी यातून काढता पाय घेतला. आता मर्यादा वाढवल्याने त्यांना जीवनदान मिळाले आहे. संस्थांना जीवंत राहण्यासाठी दरवर्षी ऑडीट, बँकेचे स्टेटमेंट आणि वर्षभराच्या कामाचा अहवाल सादर करावा लागतो. निष्क्रीय संस्था तो दाखल करण्यासाठी गर्दी करत आहेत.

राज्यात ११ हजार संस्था
राज्यात एकूण १०,९९५ मजूर सहकारी संस्था आहेत. पैकी २६६ अवसायनात, तर सुमारे ३५०० ते ४००० संस्था निष्क्रिय आहेत. ऑडिट आणि कार्य अहवाल दाखल केल्याने त्या सक्रिय होतील. २०१९-२० मध्ये या संस्थांना ४६४ कोटी ६१ लाख तर २०२०-२१ मध्ये ३२८ काेटी ४८ लाख रुपयांची कामे मिळाली होती. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे ५०० संस्था असून ३५० सक्रिय आहेत.

पालिकांची कामे मिळणार
भाजप सरकारने सहकाराचे महत्त्व कमी करण्यासाठी मजूर सहकारी संस्थांच्या कामाची मर्यादा घटवली होती. आता ती १० लाख केल्याने संस्थामध्ये उत्साह आहे. आम्हाला महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची कामे मिळावीत यासाठी पाठपुरावा सुरू आहे. -अब्दुल गफ्फार अब्दुल नबी, अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्था संघ

बातम्या आणखी आहेत...