आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किमीचे अंतर:पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आदित्य मैदान बदलून मंत्री सत्तारांवर तोफ डागणार

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे व डाॅ. श्रीकांत शिंदे यांची एकाच वेळी सभा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना लक्ष्य करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र, उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची ७ नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये सभा घेण्याचे दोन दिवसांपूर्वी ठरले. त्याच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा घेण्याचे जाहीर झाले. कायदा व सुव्यवस्था, अरुंद रस्ते, बाजारपेठ व सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी आदित्य यांच्या सभेला परवानगी नाकारल्याने आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत ठाकरेसेनेने मैदान बदलण्यास तयारी दर्शवल्याने दोन्ही सेनांना परवानगी देण्यात आली. बदललेल्या मैदानावरून आदित्य सत्तारांवर तोफ डागतील.

त्यांच्या मैदानापासून एक किलोमीटर अंतरावर डाॅ. शिंदे यांची सभा होईल. त्यात ते उद्धवसेनेवर हल्ला करतील, अशी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची अपेक्षा आहे. राज्याच्या सत्तासंघर्षानंतर सत्तार व आदित्य ठाकरे यांच्यात राजकीय वाक‌्युद्ध झाले. त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांना जिल्ह्यात सर्वप्रथम आणून सत्तार यांनी शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर येत्या ७ नोव्हेंबर रोजी आदित्य यांनी सिल्लोडला सभा जाहीर केली. प्रत्युत्तरात सत्तारांनी डाॅ. शिंदे यांची सभा ठरवली. ३१ ऑक्टोबरला सत्तार यांनी परवानगी अर्ज केला. आदित्य यांच्या सभेचा अर्ज शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे यांनी १ नोव्हेंबरला दिला.

आदित्य ठाकरेंेपेक्षा शिंदेंच्या सभेला गर्दी कमी जमली तर सत्तार येतील अडचणीत मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डाॅ. शिंदे खूप प्रभावी वक्ते नाहीत. त्यांच्या वक्तृत्वाची फारशी चर्चाही नाही. त्यामुळे त्यांच्या सभेला आदित्य ठाकरेंच्या सभेपेक्षा अधिक गर्दी जमवण्याचे आव्हान कृषिमंत्री सत्तार यांच्यापुढे राहणार आहे. डाॅ. शिंदेंची सभा गर्दीअभावी उरकली गेली तर सत्तार अडचणीत येणार आहेत. त्यांच्यावर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू होऊ शकतो. शिंदेसेनेतील त्यांचे विरोधक आक्रमक होऊ शकतात.

दिवसभर आरोप - प्रत्यारोप आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यावरून शुक्रवारी दिवसभर आरोप - प्रत्यारोप झाले. मात्र, चार वाजता ठाकरे गटाने औरंगाबाद-जळगाव बायपासवरील आंबेडकर चौकातील खुल्या मैदानावर सभा घेण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला. साडेपाच वाजता त्यांना परवानगी देण्यात आली, तर शिंदेसेनेला नगर परिषद शाळेच्या मैदानावर सभेसाठी परवानगी मिळाली.

३०० कर्मचारी, ३० अधिकारी दोन्ही सभांसाठी ७ नोव्हेंबरला दुपारी अडीच ते रात्री साडेआठ अशी वेळ असेल. चार वाजता सभा सुरू होण्याचा दावा दोन्ही गटांनी केला आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया सातत्याने सिल्लोड पोलिसांसह वरिष्ठ पोलिसांच्या संपर्कात आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ३०० पोलिस कर्मचारी, ३० अधिकारी, तीन उपअधीक्षक व वाहतूक पोलिसांची मागणी करण्यात आल्याचे निरीक्षक अशोक मुदिराज यांनी सांगितले.

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या पत्राचा संदर्भ दिला घरमोडे यांनी आदित्य यांच्या सभेसाठी महावीर चौकात चार वाजेची परवानगी मागितली होती. ती नाकारताना पोलिसांनी म्हटले की, हा गजबजलेला चौक असून रस्ते अरुंद आहेत. येथे वाहतुकीचा खोळंबा होतो. म्हणून सभेस परवानगी देऊ नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. रस्त्याच्या एका बाजूला आदित्य आणि दुसऱ्या बाजूला डाॅ. शिंदेंची सभा झाल्यास दोन्हीमधील रस्ता चिंचोळा आहे. दुतर्फा दुकाने आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मोकळ्या मैदानावर सभेची परवानगी मागावी, असे पत्र त्यांना सिल्लोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिले. त्यात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आधीच परवानगी नाकारल्याचे नमूद केलेे.

बातम्या आणखी आहेत...