आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना विचारले शास्त्रज्ञ कोण?:उत्तर- नेहरू अन् गांधी!, जिल्हा परिषद शाळेतील प्रकाराने विभागीय आयुक्त संतापले

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थळ : जिल्हा परिषद शाळा, हतनूर, ता. कन्नड प्रश्न : शास्त्रज्ञ कोण? उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू...महात्मा गांधी

हे धक्कादायक दृश्य अनुभवले महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी. विद्यार्थ्यांना थोर पुरुषांच्या, शास्त्रज्ञांच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी त्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे अहवालच बनावट असल्याचा प्रत्यक्षदर्शी पुरावा आयुक्त केंद्रेकर यांना शाळा भेटीदरम्यान पाहावयास मिळाला. त्यामुळे संतापलेल्या आयुक्तांनी ऑडिओ मेसेजद्वारे अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विशेष म्हणजे आयुक्तांची ही क्लिप अधिकाऱ्यांचाच ग्रुपमधून लीक झाल्याने शिक्षण खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली.

होय, ही क्लिप माझीच आहे : औरंगाबाद शिक्षण विभागाची परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. सीईओंनी तपासणी मोहीम घेऊन कारवाई करावी असे आदेश मी दिले आहेत. खोटे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे सुचवले आहे. यात दोषी आढळणाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा दिल्या जाणार आहेत. यात शिक्षणाधिकाऱ्यांपासून मुख्याध्यापकांचाही समावेश असेल, असे केंद्रेकर म्हणाले.

ग्रंथालय नाही, लॅबोरेटरीही जळमटात आयुक्त केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांना पाठवलेला ऑडिओ संदेश त्यांच्याच शब्दांत शुक्रवारी मी कन्नड तालुक्यातील हतनूर शाळेत भेटीसाठी गेलो होतो. शाळा कशी नसावी याचे हे उत्तम उदाहरण. हतनूरच्या शाळेत तर ग्रंथालय नावाचा प्रकारच नव्हता. लॅबोरेटरीच्या कपाटाला जाळे झालेले. दहावीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांची नावे विचारली तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी अशी उत्तरे मिळाली. दोन्ही शाळेत एकही फोटो सापडला नाही. जयंती, पुण्यतिथी साजरी केल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी अहवाल आहेत. म्हणजे धादांत खोटे अहवाल सादर होतात. अधिकाऱ्यांचे कामात लक्ष नाही. तेव्हाच्या सीईओंचेही काही खरं नव्हतं. शिक्षणाच्या दर्जावर चर्चा न करण्यासारखी आहे. शाळेचे मुख्याध्यापक गणिताचे शिक्षक. अर्धे वर्ष संपले आहे. मुलांना ए प्लस बीचा वर्ग कुणालाच सांगता आला नाही. कन्नडचे बीओ सस्पेंड होण्याच्या लायकीचे आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे. त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही असाही याचा अर्थ काढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...