आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना मृतांवरील थकीत कर्जाची माहिती मागवली:जिल्हा मध्यवर्ती सहकारी नागरी बँकांना आदेश; माफीसाठी शासनाची चाचपणी

प्रवीण ब्रह्मपूरकर |औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहकार विभागाने दिले आदेश

राज्यात कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. घरचा कमावता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबासमोर अनेक आर्थिक संकटांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता राज्य शासनाच्या सहकार विभागातर्फे जिल्हा मध्यवर्ती तसेच नागरी सहकारी बँकांकडून संबंधित मृत व्यक्तीवर किती कर्ज असून किती कर्ज थकीत आहे, याची माहिती मागवली आहे. याबाबत सहकारमंत्री अतुल सावे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, सहकार विभागाने त्यांच्याकडे असलेल्या कर्जाची माहिती मागवली आहे. आम्ही कोणाकडे किती कर्ज आहे, याची चाचपणी करत आहोत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. कोरोनो कालावधीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटंबांना मोठी आर्थिक झळ बसलेली आहे. मृत कर्जदाराचे राहते घर, इतर मालमत्ता तारण असल्यास अशा वेळी त्यांच्या कुटंुबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोरोना मृतांबद्दलची माहिती मागवली आहे.

ही माहिती मागवली सहकार आयुक्तांनी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना याबाबत पत्र पाठवले आहे. त्यामध्ये कोरोना संक्रमणाच्या काळात निधन झालेल्या व्यक्तीवर किती कर्ज आहे, थकीत कर्जाची एकूण रक्कम, तारण मालमत्ता, कर्ज एनपीएमध्ये गेले असल्यास त्याचाही तपशील मागवला आहे. सर्व जिल्ह्यांतील जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्थांकडून सहकार विभागाने तसे सर्वांना आदेश दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार याबाबत साधारण किती रक्कम कर्जाची असू शकते, याचा अंदाज घेत आहे. त्यामुळे त्यांना कर्जमाफी तसेच इतर काही सूट देता येईल का, आणखी काही मदत करता येते का, याची चाचपणी करण्यात येत आहे.

कर्जबाबत माहिती मागवली, मदत करण्याचा विचार ^कोरोनामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले आहेत. सहकार विभागाच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती, कुणावर किती कर्ज आहे याची माहिती मागवली आहे. त्यावर शासन स्तरावर काय मदत करायची याबाबत विचार केला जाईल - अतुल सावे, सहकारमंत्री

औरंगाबाद जिल्ह्यात ३,७४९ जणांचा मृत्यू औरंगाबाद शहरात २०४३ जणांना मृत्यू झाला होता, तर ग्रामीण भागात १७०६ जणांचा मृत्यू झाला होता. मार्चअखेर राज्यात एक लाख ४२ हजार मृत्यू झाले होते. त्यापैकी सरकारकडे मदतीसाठी २ लाख ४१ हजार जणांनी अर्ज केले होते. यामध्ये एक लाख ५६ हजार जणांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत मिळाली, तर ४० हजार लोकांचे अर्ज फेटाळले होते.

बातम्या आणखी आहेत...