आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजूनही "ती" तशी "बाजूला"च:अस्मिता योजनेवर प्रश्नचिन्ह; ​​​​​​​सॅनिटरी नॅपकिनचा लाभ अवघ्या 16 हजार युवतींनाच

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • सॅनिटरी पॅडसाठी नोंदणीकृत विद्यार्थीनींची आकडेवारी

अजूनही महिलांचे स्त्रीत्व बाजूलाच ठेवण्यात येत असल्याचे अधाेरेखित हाेत आहे. माेठा गाजावाजा करून ग्रामीण भागातील युवतींसाठी त्यांच्या त्या चार दिवसांची साेय व्हावी म्हणून आणि आराेग्याचाही विचार करून सॅनिटरी नॅपकिन देण्याची सुरू केलेली अस्मिता प्लस याेजनाही कराेनाचे कारण सांगून "बाजूला"च ठेवली जात असल्याचे स्पष्ट हाेत आहे. जिल्हा परिषद शाळेतील वयात येऊ घातलेल्या विद्यार्थिनींची संख्या ४६ हजार ८१६ एवढी असली तरी नॅपकिनचा लाभ घेणाऱ्या त्यातील केवळ १६ हजार ४५४ एवढ्याच मुली असल्याचे समाेर आले आहे.

मासिक पाळीच्या कालावधीत आराेग्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात अद्यापही वयात येणाऱ्या मुलींसाठी घ्यावयाची काळजी घेतली जात नाही. कसं बाेलायचे, सांगायचे कसे, या विचाराने त्या चार दिवसांच्या कालावधीबाबत गुपित ठेवण्याचा कल आणि त्यातून मुलींमध्ये उद्भवणारे आजार पाहता शासनाने २०१८ साली अस्मिता प्लस ही याेजना माेठ्या थाटात सुरू केली. मात्र, मागील तीन वर्षांत जिल्हयातील जिल्हा परिषद शाळांमधील केवळ १६ हजार ४५४ विद्यार्थीनींनीच सॅनिटरी नॅपकिनचा लाभ घेतला.

विद्यार्थीनींची एकूण संख्या ही ४६ हजार ८१६ असून या याेजनेचा लाभ घेण्यापासून अजूनही ३० हजार ३६२ विद्यार्थीनी वंचित राहिल्या असल्याचे समोर आले आहे. यातून नॅपकिनचा वापर करणाऱ्या ग्रामीण भागातील मुलींची टक्केवारी अवघी १७ टक्केवारी आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांमध्ये ८ सॅनिटरी नॅपकीन देण्याची अस्मिता प्लस ही योजना ग्रामविकास विभागांतर्गत उमेद अभियानामार्फत राबविली जाते.

या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना २४० मीमीच्या ८ पॅडचे एक पाकीट ५ रुपयांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येतात. असे एक वर्षासाठी १३ पाकीट देण्यात येतात. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांमार्फत अस्मिता कार्ड योजनेसाठी विद्यार्थींनीच नोंदणी करण्यात अडचणी निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

योजनेचे काम ऑनलाईन पद्धतीने
योजनेचा लाभ विद्यार्थीनींना देण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने २०१८ पासून ही सुविधा देण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे पाेहाेचवण्याच्या यंत्रणेत अडचणी येत आहेत. मात्र योजना सुरुच आहे. - संगीता पाटील, संचालक, विकाससेवा प्रकल्प.

सॅनिटरी पॅडसाठी नोंदणीकृत विद्यार्थीनींची आकडेवारी

औरंगाबाद २०५२, गंगापूर १९२७, कन्नड १६०७, खुलताबाद १०६३, पैठण २७०९, फुलंब्री १५३०, सिल्लोड २८७०, सोयगाव ९४५, वैजापूर १७५१, अशी एकूण १६ हजार ४५४.

बातम्या आणखी आहेत...