आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:कळमनुरी पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकाऱ्यास 7000 रुपयांची लाच घेताना पकडले

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव ग्रामपंचायतचा स्वच्छतागृहाचा धनादेश देण्यासाठी ७००० रुपयांची लाच घेणाऱ्या कळमनुरी पंचायत समितीच्या सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (ता. १४) सायंकाळी पाच वाजता रंगेहात पकडले.

या बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील ग्रामपंचायतीने सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम केले. या बांधकामाचा ३ लाख ८४ हजार रुपयाचा धनादेश  पंचायत समितीच्या लेखा विभागाकडून मिळणे बाकी होते. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयाकडे  मागील सहा महिन्यापासून चकरा मारण्यास सुरुवात केली. वारंवार विनंती करूनही धनादेश दिला जात नव्हता. 

 त्यानंतर सहाय्यक लेखाधिकारी दत्तात्रय शिंदे याने धनादेश देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार लाचलुचपतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफूने,  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बुरकुले, जमादार रुद्रा कबाडे, संतोष दुमाने, अवी कीर्तनकार, विनोद देशमुख, प्रमोद थोरात, ज्ञानेश्वर पंचलिंगे यांच्या पथकाने कळमनुरी पंचायत समितीच्या परिसरात सापळा रचला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सहायक लेखाधिकारी शिंदे याने ७००० रुपयांची लाच घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले. या प्रकरणी कळमनुरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे लाचलुचपत विभागाच्या सूत्रांनी सांगितले.