आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई येथील रॅपीड ॲक्शन फोर्स मध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बालाजी किसन धुळे (४८) यांचा दिव दमण येथे बंदोबस्तावर असतांना ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी ता. २८ त्यांच्या मुळगावी कुपटी (ता.वसमत) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
वसमत तालुक्यातील कुपटी येथील बालाजी किसन धुळे हे नवी मुंबई येथे रॅपीड ॲक्शन फोर्स बटालीयन १०२ मध्ये सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या बटालीयन मधील एक पथक काही दिवसांपुर्वीच दिव दमण येथे बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी ता. २६ रात्री त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्यांच्या बटालीयनकडून कुरुंदा पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती गावात त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांचे पार्थिव रुग्णवाहिकेद्वारे कुपटी येथे आणले जाणार असून सोमवारी ता. २८ त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कुपटी येथील बालाजी धुळे यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले होते. उत्कृष्ठ कुस्तीपट्टू मधून त्यांची ओळख होती. त्यातूनच त्यांनी १९९१ मध्ये नांदेड येथे केंद्रीय राखीव दलात भरती झाले. त्यानंतर त्यांनी कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना मुंबई येथील १०२ रॅपीड ॲक्शन फोर्स मध्ये नियुक्ती मिळाली होती. मागील १० ते १२ दिवसांपुर्वीच ते दिर्घसुट्टी वरून कर्तव्यावर रुजु झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
गुड नाईटचा संदेश ठरला अखेरचा
कुपटी येथील त्यांचे मित्र उत्तम लेकुळे हे दोन महिन्यापुर्वीच सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा बालाजी धुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद होत होता. त्यांनी धुळे यांना शनिवारी ता. २६ रात्री गुड नाईटचा संदेश पाठविला होता. त्यानंतर आज सकाळी बालाजी धुळे यांच्या निधनाचे वृत्त कानी पडल्याचे लेकुळे यांनी सांगितले. अत्यंत मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून धुळे हे परिचित होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.