आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सातशे काेटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्गावर 14 काेटी झाडे लावणार

नामदेव खेडकर | औरंगाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील सर्वात सुंदर, हरित रस्ता ठरेल

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर दुतर्फा भारतीय वंशाच्या दीर्घायुषी झाडांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी एक किलोमीटरमध्ये एक कोटी रुपये खर्च येईल. एक किलोमीटर अंतरात एकूण २ लाख झाडे लावली जातील. येत्या पावसाळ्यात ही वृक्षलागवड होणार असून सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे.

७२२ किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग आहे. सध्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गासाठी लाखो झाडे तोडली, शेती उजाड झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. एक किलोमीटर अंतरात किमान २ लाख झाडे लावली जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने झाडे लावण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा जागा शिल्लक आहे.

दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३५ मीटर जागा
समृद्धी महामार्गासाठी एकूण १२० मीटर (४०० फूट) रुंद जागेचे संपादन झालेले आहे. यापैकी केवळ ५० मीटर अंतरातच प्रत्यक्ष रस्ता बांधला जात आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तब्बल ३५ मीटर जागा शिल्लक आहे. या जागेतच वृक्षारोपण होणार आहे.

एक झाड ५० रुपयांना
एक किलोमीटर अंतरात १ कोटी रुपये खर्चून २ लाख झाडे लावली जाणार आहेत. यात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, जांभूळ, करंज, शमी, बेल आदी देशी प्रजातींचा समावेश असेल. एका झाडासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ५० रुपये खर्च करणार आहे.
एक किलोमीटरसाठी एक कोटी रुपये खर्च; निविदा प्रक्रिया सुुरू

२०२२ मध्ये होईल रस्ता पूर्ण
सध्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या रस्त्यावर १ मे २०२१ रोजीच वाहतूक सुरू करण्याचे नियोजन रस्ते विकास महामंडळाने केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे परप्रांतीय कामगार आपापल्या राज्यात गेल्याने या कामाची गती अर्ध्यावर आली. आता जानेवारी २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.

देशातील सर्वात सुंदर, हरित रस्ता ठरेल
आज लावलेली झाडे पाच वर्षांपर्यंत बरीच मोठी होतील. ७०० किलोमीटर लांब आणि दोन्ही बाजूंनी ३५ मीटर रुंदीचा हरितपट्टा देशात कुठेही नाही. त्यामुळे हा रस्ता देशातील सर्वात सुंदर रस्ता ठरेल. - बी. पी. साळुंके, मुख्य अभियंता, एमएसआरडीसी, औरंगाबाद.
ठिबक सिंचनासह पाच वर्षे जगवण्याची हमी : एका झाडासाठी महामंडळ ५० रुपये मोजणार आहे. यात वृक्षलागवडीसह सर्व झाडांना ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे आणि पाच वर्षे सर्व झाडांचे संगोपन करण्याच्या अटी आहेत. पाच वर्षे होईपर्यंत ठेकेदारांची ठराविक रक्कम राखून ठेवली जाणार आहे.