आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज ठाकरे यांच्या सभेत रविवारी चोरट्यांनी अनेक नागरिकांची पाकिटे लंपास केली. मात्र चोरलेल्या पैशाच्या वाटणीवरून दोन आरोपींनी १४ वर्षांच्या साथीदाराला चाकूने भोसकले. यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी सिटी चौक पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एन. माने यांनी सोमवारी त्यांना सहा मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. जुबेर खान जफर खान (२१) आणि अकबर खान रऊफ खान (४६, दोघे रा. बायजीपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.
इम्रान खान आरेफ खान (२२ भडकल गेट) याने याबाबत फिर्याद दिली. जखमी मुलगा हा इम्रानच्या मोठ्या भावाचा मेहुणा आहे. हे दोघे व त्यांचे कुटुंबीय भीक मागून उदरनिर्वाह चालवतात. तर आरोपी जुबेर आणि अकबर हे दोघे इम्रानचे चुलत भाऊ आहेत. अकबर आणि जुबेर हे रिक्षाचालक समीर महेबूब पठाण याच्या मदतीने शहरात पाकीटमारी करतात.
१ मे रोजी सायंकाळी इम्रान व त्याचा नातेवाईक अल्पवयीन मुलगा भडकल गेट परिसरात भीक मागत होता. त्या वेळी अकबर खान, जुबेर खान हे समीर पठाण याच्या रिक्षात बसून इम्रानकडे आले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेला खूप गर्दी आहे, तिथे काही कमाई होईल असे सांगून या तिघांनी इम्रान व अल्पवयीन मुलाला रिक्षात बसवून तिकडे नेले. या सर्वांनी गर्दीत घुसून अनेकांची पाकिटे मारली. चोरलेल्या पैशातून त्यांनी बुढीलेन येथील हॉटेलात जेवण केले.
हॉटेलातून बाहेर पडताना १४ वर्षीय मुलाने चोरीच्या पैशातील हिस्सा अकबरला मागितला. मात्र अकबर व जुबेरने पैसे देण्यास नकार देत त्याला शिवीगाळ केली. यापूर्वी दिलेले दोन हजार रुपये परत कर, असे सुनावले. मात्र अल्पवयीन साथीदाराने पुन्हा पैसे मागितल्याने या दोघांनी त्याला मारहाण केली. इम्रानने अकबरला बाजूला केले. त्याच वेळी जुबेरने चाकू काढून अल्पवयीन मुलाच्या पोटात भोसकून गंभीर जखमी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.