आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आखाडा बाळापूर पोलिसांनी सतर्कता दाखविल्याने चोरट्यांचा प्रयत्न फासला. गुरुवारी ता. १७ पहाटे हा प्रकार घडला आहे. या एटीएममध्ये १० लाख रुपयांची रोकड होती.
नांदेड ते हिंगोली या राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेचे त्या ठिकाणी एटीएम मशीन देखील आहे. राष्ट्रीय महामार्गावर एटीएम असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच परिसरातील नागरीकांना या एटीएमचा मोठा फायदा होताे.
दरम्यान, गुरुवारी ता. १७ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या एटीएमच्या पाठीमागे असलेल्या स्टोअर रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी स्टोअर रुम व इतर ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. त्यानंतर एटीएमच्या पाठीमागील बाजूस भिंतीला लावण्यात आलेले कपाट सरकवून एटीएमच्या खोलीच्या मागील बाजूची भिंत फोडली. त्यानंतर एटीएमचा पत्रा कापण्याचा प्रयत्न केला.
मात्र याबाबतचा अलर्टचा संदेश पहाटे साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, जमादार भगवान वडकिले, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या वाहनामुळे चोरटे पसार झाले.
दरम्यान, या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक किरण सुर्वे यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी बँकेच्या एटीएमचा काही भाग कापण्यात आल्याचे सांगितले. एटीएममध्ये सुमारे १० लाखापर्यंत रक्कम होती. सध्या पोलिसांची कारवाई सुरु असून त्यानंतर एटीएमचे इंजिनीयर आल्यानंतरच नेमके पैसे कमी झाले काय याची माहिती मिळू शकणार आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार रक्कम सुरक्षीत असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.