आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने नव्या पाणी योजनेचा पूर्ण खर्च म्हणजे १६८० कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळवण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे. सातारा-देवळाईचा २५४ कोटींचा ड्रेनेज प्रकल्पही केंद्रापुढे सादर करण्याची तयारी सुरू आहे. अर्थात ही सर्व प्रशासकीय तयारी आहे. त्यात शिवसेना विरुद्ध भाजप अशी श्रेयवादाची लढाई सुरू झाली तर पाणी योजना रेंगाळून १७ लाख औरंगाबादकरांचा घसा आणखी कोरडा पडण्याची शक्यता आहे. पाणी आणि ड्रेनेज प्रकल्पाचा केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेत समावेश प्रस्तावाचे बुधवारी (४ मे) मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासमोर सादरीकरण झाले. त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. त्यांचा समावेश करून चार दिवसात सुधारित प्रस्ताव चार दिवसांत राज्य शासनाकडे पाठवला जाणार असल्याचे पांडेय यांनी सांगितले.
केंद्र सरकारमार्फत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज प्रकल्प अमृत-२ मधून या योजना राबविल्या जाणार आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. शहराची १६८० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. सातारा-देवळाईसाठी २५४ कोटी रुपयांची ड्रेनेज योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या दोन्ही योजनांचा अमृत-२ मध्ये समावेश करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अजयसिंग, मनपाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, प्रकल्प समन्वयक अफसर सिद्दिकी, सिकंदर अली, उपअभियंता के. एम. फालक, कार्यकारी अभियंता बी. डी. फड, पीएमसीचे समीर जोशी आदींची उपस्थिती होती.
आतातरी श्रेयवादाची लढाई नको
अमृत-२ मध्ये ही योजना गेल्यास पुन्हा राज्य आणि केंद्र म्हणजेच शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांत श्रेय घेण्यासाठी लढाई सुरू होऊ शकते. या श्रेयवादाच्या लढाईमुळे घरकुल योजनेला विलंब झाला. अगदी शेवटच्या टप्प्यात घरकुलाची योजना मंजूर झाली. त्यात वर्षभराचा उशीर झाला. तसाच प्रकार पाणीपुरवठा योजनेत होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास १७ लाख औरंगाबादकरांच्या त्रासात भर पडणार असल्याचा सूर अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.