आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केला हवेत गोळीबार:औंढ्यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून दोन राऊंड फायर; दगडफेक करणारे पाच ताब्यात, वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणात पोलिसांकडून सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल केले

औढा नागनाथ पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी शनिवारी ता. 15 दुपारी हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर जमाव पांगला. मात्र यावेळी झालेल्या दगडफेकीत एका पोलिस उपनिरीक्षकासह सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील मोजीद सय्यद रफीक या तरुणाचा भ्रमणध्वनी ता. 12 मे रोजी हरवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा भ्रमणध्वनी पुर्णपणे बंद होते. मात्र शुक्रवारी ता. 14 मे रोजी भ्रमणध्वनी सुरु झाल्यानंतर मोजीद याने त्यावर संपर्क साधून भ्रमणध्वनी देण्याची मागणी केली. मात्र समोरील व्यक्तीने त्यास अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली. सदर संभाषणाची क्लीप व्हायरलदेखील झाली. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री मोजीद याने औंढा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दिला. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली.

दरम्यान, आज दुपारच्या सुमारास सुमारे शंभर जणांचा जमाव औंढा पोलिस ठाण्याच्या समोर आला. त्यानंतर पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्यासह पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमावाने पोलिसांवर व पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यास सुरवात केली. या दगडफेकीत पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार ज्ञानेश्‍वर गोरे, शेख एक्बाल, राजकुमार सुर्य हे जखमी झाले. जमाव आक्रमक होत असल्याने पोलिस निरीक्षक मुंडे यांनी हवेत दोन राऊंड फायर केले. त्यानंतर जमाव पांगला.

दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्या पोलिस अधिक्षकारी व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांच्यासह दंगाकाबू पथक औंढा नागनाथ येथे दाखल झाले आहे. सध्या औंढा शहरात शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांकडून सुमारे 100 ते 150 जणांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून आता पर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...