आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Aurangabad
 • Auranagabad | Marathi News | Talathi Recruitment | The Report Of Talathi Recruitment Scam Was Rolled Out By The State Government Itself; Photo Of One On Holtikit, Exam Given By Another

दिव्य मराठी एक्स्पोज:तलाठी भरती घोटाळ्याचा अहवाल राज्य सरकारनेच गुंडाळला बासनात; हॉलतिकीटवर फोटो एकाचा, परीक्षा दिली दुसऱ्याने

महेश जोशी |औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यात २०१९ मधील तलाठी भरतीत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ते नेमके कोणत्या परीक्षेसाठी बसले, उत्तीर्ण झाल्यावर कोणते पद मिळणार इथपासून परीक्षेची तारीख, वेळही माहिती नव्हती. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारला अहवाल सादर केला.

मात्र, तो सरकारने स्वीकारलाच नाही. शासनाच्या महाआयटी कंपनीने २०१७ मध्ये भरतीसाठी अमेरिकेतील यूएसटी ग्लोबल आणि भारतीय कंपनी अर्सेअस इन्फोटेकची टेंडरद्वारे निवड केली. महायुती सरकारने २०१७ ते २०१९ दरम्यान २५ विभागातील ३० हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी ३१ परीक्षा घेतल्या. मात्र, त्या वादात सापडल्या.

३४ जिल्ह्यांत परीक्षा :
महापरीक्षा पोर्टलमार्फत ३४ जिल्ह्यांत ११ खात्यातील गट क व ड पदांसाठी २ ते २६ जुलै दरम्यान परीक्षा घेण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यात गट-क तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली. २७ फेब्रुवारी १९ रोजी जाहिरात, २ ते ७ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा, २३ डिसेंबर १९ रोजी निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली तर ३ ते ७ जानेवारी २०२० दरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

या प्रक्रियेवर तत्कालीन जिल्हाधिकारी तथा निवड समितीचे अध्यक्ष राहुल द्विवेदी यांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. कागदपत्रांच्या पडताळणीतही काही उमेदवार शंकास्पद आढळले. द्विवेदी यांनी महाआयटी व महापरीक्षा पोर्टलकडे प्रारूप यादीतील २३६ उमेदवारांचे सीसीटीव्ही फुटेज व त्याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला.

मात्र, बिंग फुटण्याच्या भीतीने खासगी कंपन्यांनी फुटेज व्यापक स्वरूपातील असल्याचे सांगत देण्यास टाळाटाळ केली. नंतर ८ मे २० रोजी यूएसटी ग्लोबलने शंका असणाऱ्या १४ उमेदवारांचे फुटेज व अहवाल दिला. १४ मे २० रोजी निवड समितीने फुटेजच्या आधारे उमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची नव्याने तपासणी केली. यात त्यांना धक्का बसला.

दोन ठिकाणी एकच डमी उमेदवार : उमेदवार ४ याने १६ जुुलै १९ रोजी पॉलीटेक्नीक कॉलेज चंद्रपूर तर उमेदवार ५ याने १६ जुलै १९ रोजी गुरूसाई पॉलिटेक्नीक चंद्रपूर येथे परीक्षा दिली. प्रत्यक्षात या जागी एकच व्यक्ती परीक्षेला बसली होती.

पदांची माहिती नाही : द्विवेदी यांनी काही उमेदवारांच्या मुुलाखती घेतल्या. पैकी परीक्षेतील टॉपर्संनाही त्यांनी कोणती परीक्षा दिली, कोणते पद मिळणार याची माहिती नव्हती. काहींना परीक्षा कधी, कोणत्या सेंटरवर झाली हे सुद्धा सांगता येत नव्हते.

राज्यभर असेच प्रकार : संपूर्ण भरती प्रक्रियाच संशयास्पद असून त्यात अनियमितता झाल्याने ती रद्द करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी १४ मेे २० रोजी दिले. २२ मे २०२० रोजी त्यांनी महसूल खात्याच्या अपर मुख्य सचिवांना भरती प्रक्रियेतील अनियमिततेचा १२ पानी अहवाल पाठवला. मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. ४ मे २० रोजी राज्याच्या वित्त विभागाने आर्थिक कारणे देत नवीन भरतीवर बंदी आणली.

द्विवेदी यांची बदली : फडणवीस यांच्याकडील सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. द्विवेदी यांनी मे २० मध्ये घोटाळा उघडकीस आणल्यानंतर ऑक्टोबर २० मध्ये त्यांची बदली झाली. त्यांच्या पाठोपाठ महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील यांचीही बदली झाली.

सहीत बदल, उमेदवारही वेगळेच : दैनिक दिव्य मराठीकडे शंका असलेल्या १४ उमेदवारांची सविस्तर माहिती आहे. मात्र, चौकशी सुरू असल्याने त्यांची नावे प्रसिद्ध करता येत नाहीत. फुटेजच्या आधारे जिल्हा निवड समितीने त्यांच्यावर नोंदवलेले आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत :

 • उमेदवार १-फुटेजमध्ये आहे. मूळ हॉलतिकीट नाही. त्यावर फोटो नाही. स्वाक्षरी- फोटोत तफावत,अर्जावर भावाची सही { उमेदवार २, ३, ४, ५ फुटेजमध्ये दिसतात. पण सही, फाेटोत तफावत.
 • उमेदवार ६, ७, ८, ९, १० यांचे फुटेज उपलब्ध नाही. सही, फाेटोत तफावत. लिंगात बदल { उमेदवार ११, १२, १३, १४ चे फुटेज उपलब्ध. फुटेजमधील उमेदवाराचीओळख पटत नाही. सही, फाेटोत तफावत.
 • आघाडी सरकारने बंद केले पोर्टल
 • द्विवेदी यांच्या अहवालावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मार्च २१ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. घोटाळ्याची त्यांनी मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याशी तुलना केली होती.
 • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार रोहित पवार यांनीही यावर कारवाईची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात काहीही झालेले नाही.
 • द्विवेदी यांच्या अहवालावर कारवाई करण्याऐवजी आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टलच बंद करून टाकले.
बातम्या आणखी आहेत...